मुंबई : गणेशोत्सव मंडळांने मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड अखेर मागे घेण्यात आला आहे. मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. हा दंड रद्द करावा अशी मागणी भाजपसहित सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना थेट दंड कमी करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर तातडीने दंडाची वाढीव रक्कम कमी करण्यात आली.
मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रकही काढले आहे. त्यात खड्ड्यांबाबत सूचना देण्यात आली आहे. या सूचनेनुसार गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास प्रति खड्डा तब्बल १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला होता.
आतापर्यंत प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत असताना त्यात एकदम सात पट वाढ केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. गणेशोत्सव समितीनेही दंडाची वाढीव रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. गणेशोत्सव मंडळांची ही नाराजी राजकीय पक्षांनी बरोबर हेरली. या विषयाचे राजकारणही सुरू झाले. सर्वच राजकीय पक्षांनीही या वाढीव दंडावरून मुंबई महापालिकेवर टीकाकेली. तसेच दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही (ठाकरे) केली होती मागणी
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात येऊन अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती व दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. तसेच रक्कम कमी न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. तर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय दीना पाटील यांनीही दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती.
उपमुख्यमंत्र्यांची भाजपवर कुरघोडी
गणेशोत्सव मंडळांवरील खड्डयाबाबतच्या दंडाची रक्कम कमी करून घेऊ, असे आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील जनता दरबारात दिले होते. त्याला चोवीस तास उलटत नाही तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश दिले. तसेच याबाबतची माहितीही समाज माध्यमांवर जाहीर केली.
पालिका आयुक्तांचाही दुजोरा
गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
मुंबईत सुमारे दहा ते अकरा हजार सार्वजनिक मंडळे असून त्यापैकी दोन ते तीन हजार मंडळे ही रस्त्यावर किंवा पदपथावर मंडप उभारून उत्सव साजरा करतात. या मंडळांना मंडप उभण्ण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरीता मंडळे पालिका विभाग कार्यालयांकडे अर्ज करतात तेव्हा त्यांना अनामत रक्कम भरावी लागते. २० ते ४० हजारापासून लाखो रुपयांपर्यंत ही अनामत रक्कम असते.
मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खणण्यात येणारे खड्डे मंडळांनी बुजवावे म्हणून ही रक्कम घेतली जाते. मंडळांनी खड्डे बुजवल्यानंतर ही रक्कम मंडळांना परत केली जाते. महापालिकेला खड्डे बुजवावे लागले तर त्याचा खर्च या रकमेतून वजा केला जातो. न्यायालयाने २०१७ मध्ये रस्त्यांवरील मंडपांबाबतच्या याचिकेवर निर्णय देताना प्रति खड्डा दंडाची रक्कम दोन हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार हा दंड घेतला जातो, अशी माहिती गणेशोत्सव समितीचे ॲड. नरेश दहिबावकर यांनी दिली.