मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासंदर्भात मंत्री, आमदार आणि खासदार यांची तातडीची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि ठाणे महापालिकेवर भगवा फडकवा, असे आदेशच शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

महापालिका निवडणुकांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे. ठाकरे गटातील नगरसेवकांपैकी ४६ माजी नगरसेवकाना आपल्या गटात घेण्यात शिंदेंना यश आले. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अस्वस्थ झालेल्या यातील ११ नगरसेवकांनी परतीचे प्रयत्न सुरू केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका निवडणुकांसाठी रविवारी शिदे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. या बैठकीआधी या ११ नगरसेवकांना ‘जंजिरा’ बंगल्यावर पाचारण करण्यात आले. त्यांची समजूत काढण्यात आली.

या बैठकीनंतर मुंबई आणि ठाण्यातील आमदारांची स्वतंत्र बैठकही घेण्यात आली. यात प्रत्येक आमदारांवर विभागीय जबाबदारी सोपविण्यात आली.