मुंबई : मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ आणि उप अभियंता पदासाठी ९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र, या परीक्षेत पेपर फुटीचा प्रकार घडू नये, यासाठी संबंधित परीक्षा अधिकृत केंद्रावर घेण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. दानवे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. तसेच मागणीसंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कनिष्ठ आणि उप अभियंता पदाच्या परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी होत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी तलाठी व अन्य परीक्षांचे पेपर फुटले होते. ज्या संस्थेमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्याच संस्थेवर कनिष्ठ व उप अभियंता पदाच्या परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार, मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली.

तसेच दादर (पय) परिसरातील भवानी शंकर रोड येथील पालिकेची सीबीएसई शाळा व मुंबई पब्लिक स्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, परीक्षा केंद्रावरील संगणक, कीबोर्ड सुस्थितीत असल्याची पडताळणी करावी, परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर अंतरावरील सर्व झेरॉक्स केंद्रे बंद करण्यात यावे आणि परीक्षा केंद्राच्या २०० मीटर अंतरावर कलम १४४ लागू करावे, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोशिएशनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exams for post of junior and deputy engineers of bmc conducted online ambadas ddanve urges exams held at official centers to prevent paper leak mumbai print news sud 02