मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतच्या प्रारुप आराखड्यावरील हरकती व सूचनांवरील सुनावणी पार पडल्यानंतर आता आराखडा अंतिम होण्याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंंतिम केलेली प्रभाग रचना राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात किती बदल करण्यात आले याबाबत आता उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांचा अंतिम आराखडा ६ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा २२ ऑगस्ट रोजी जाहीर केला. या प्रारुप आराखड्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मुंबई महापालिकेकडे ४९४ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या ४९४ हरकती व सूचनांवर गेल्या आठवडयात सुनावणी पार पडली.

तीन दिवस ही सुनावणी सुरू होती. महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फत ही सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सह आयुक्त (निवडणूक आणि कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ही सुनावणी पार पडल्यानंतर आता आलेल्या तक्रारी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडे पाठवण्याआधी राज्य सरकार त्यात काही बदल सुचवू शकतात. निवडणूक आयोगाकडे आराखडा पाठवल्यानंतर प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील शिफारशींवर निवडणूक आयोग विचार करेल. यात काही बदल असतील आणि त्याचे योग्य स्पष्टीकरण असेल तर निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला मान्यता देईल.

मोठे बदल असल्यास आयोग त्याचे सादरीकरण मागू शकते. अन्यथा निवडणूक आयाोगाने मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम आराखडा ६ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. मुंबई महापालिकेला अंतिम आऱाखडा जाहीर करण्यासाठी ६ ऑक्टोबरची मुदत आयोगाने वेळापत्रकानुसार ठरवून दिली आहे.