मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था व शिक्षण विभागातील आनागोंदी यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेपेक्षा रविवारीच्या एकादशीला पंढरपूरच्या विठू माऊलीच्या दर्शनाला सदस्यांनी प्राधान्य दिले. विधानसभेचे कामकाजही वारीनिमित्त लवकर संपविण्यात आले.

दानवे यांनी प्रस्ताव मांडताना सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर काँग्रेसच्या भाई जगताप यांचे भाषण थांबवून पंढपूरला जायचे आहे सांगून ही चर्चा सोमवारपर्यंत लांबणीवर ढकलण्यात आली. पंढरपूरच्या विठोबाचे मीही दरवर्षी दर्शन घेतो पण ही चर्चा महत्वाची आहे सांगत एकनाथ खडसे यांनी ही चर्चा थांबवल्याने सभात्याग केला.

विधानसभेत भाजपचे रणजित सावरकर यांनी वारीसाठी कामकाज लवकर संपवावे, अशी मागणी केली. अनेक आमदारांना वारीच्या व्यवस्थापनासाठी मतदारसंघात जायचे आहे. त्यासाठी कामकाज ३ वाजता संपवावे, अशीही मागणी त्यांनी केली. यानुसार कामकाज ३ वाजता थांबविण्यात आले.