मुंबई : न्यायालयाने यंदा सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे, महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यावर भर दिला असून गेल्या वर्षींच्या तुलनेत ७१ अतिरिक्त कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गतवर्षी ही संख्या २०४ होती, तर यंदा ती २७५ करण्यात आली आहे. याशिवाय, घरगुती गणेशमूर्तींचे बादली किंवा पिंपात विसर्जन करण्याचा पर्याय अवलंबण्याचे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना केले गेले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात दिलेले आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) मार्गदर्शक तत्वांना अनुसरून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. विसर्जनानंतर गणेशमूर्तींवर प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून या कार्यपद्धतीनुसार मूर्ती विसर्जनानंतर त्यांची पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.
न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सहा फूटांपर्यंतच्या सर्वच घरगुती गणेशमूर्तींचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कृत्रिम तलाव तयार करण्यावर भर दिला आहे. तसेच, यंदा नैसर्गिक विसर्जन स्थळांवरही कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गतवर्षी महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांत मिळून एकूण २०४ कृत्रिम तलाव तयार केले होते. मात्र, यंदा पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी अधिकाधिक कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २७५ हून अधिक कृत्रिम तलाव उभारणीचे पालिकेने हाती घेतले आहे. गिरगाव चौपाटीवरही एकूण पाच कृत्रिम तलाव केले जाणार आहेत.
दरम्यान, घरगुती निसर्गस्नेही गणेशमूर्ती घरी बादली किंवा पिंप यात विसर्जित करावी. तसेच, सोसायटीतील नागरिकांनी एकत्रितपणे व्यवस्था करुन मूर्ती विसर्जन करावे. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पीओपी मूर्ती जवळच्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
तलावांची यादी कुठे मिळणार ?
निसर्गस्नेही किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. या तलावांची यादी महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, यादी पाहण्यासाठीचे क्यूआर कोड विविध माध्यमातून प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यानुसार घरानजीकचा तलाव शोधून तेथे मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
निर्माल्य संकलनासाठी सेवा
प्रत्येक मंडळाने गणेशोत्सव कालावधीत निर्माल्य साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. निर्माल्याचे व्यवस्थित वर्गीकरण करावे. तसेच ज्यापासून खत तयार करता येऊ शकत नाही, असे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावे. संकलित होणारे निर्माल्य हे महानगरपालिकेच्या निर्माल्य वाहनास हस्तांतरित करावे. अधिक माहितीसाठी नजीकच्या प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. करण्यात येत आहे