मुंबई : लातूर आणि नांदेड येथील दोन गुन्ह्यांत सहा कोटी रुपयांची रोख रक्कम लुटून फरार असलेला कुख्यात गुंड शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी दिंडोशी येथून अटक केली. शिवा शेट्टी सराईत गुंड असून त्याच्याविरोधात ३५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या टोळीने महाराष्ट्राच्या विविध भागात आपली दहशत निर्माण केली होती.

कुख्यात गुंड शिवा शेटी २०२३ मध्ये तुरूंगातून जामिनावर सुटल्यानंतर सक्रिय झाला होता. त्याने लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल सहा कोटी रुपये रोख रक्कम लुटली होती. नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरावर दरोडाही घातला होता. त्याच्या विरोधात नांदेड गाव पोलीस ठाणे (नांदेड) आणि किनगाव पोलीस ठाणे (लातूर ) येथे चोरी आणि दरोड्याप्रकरणी गुन्हे दाखल होते. मात्र शेट्टी पोलिसांना चकमा देत फरार झाला होता. लातूर आणि नांदेड पोलिसांचे संयुक्त पथक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आरे पोलिसांना शेट्टी दिंडोशी परिसरात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून शेट्टीला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी नांदेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोण आहे गुंड शिवा शेट्टी ?

मुळचा मुंबईमधील असलेला शिवा शेट्टी पूर्वी चित्रनगरीत (फिल्मसिटी) सेट उभारण्याचे काम करीत होता. नंतर तो गुन्हेगारीकडे वळला. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, मारहाण, खंडणी, हत्येचा प्रयत्न प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०१९ मध्ये मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय झाला. राज्यातील विविध भागात त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हे करण्यास सुरवात केली होती.