मुंबई : गोरेगाव येथे नातवाने रस्त्यात टाकलेल्या ७० वर्षीय आजीचा अखेर मृत्यू झाला आहे. यशोदा गायकवाड (७०) असे या आजीचे नाव असून त्या भाईंदर जवळील उत्तन गावातील एका आश्रमात उपचार घेत होत्या. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता.

यशोदा गायकवाड गोरेगावच्या आरे येथील दर्गा रस्त्यावरील निर्जन भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवार २१ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास आढळल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच आरे पोलिसांना गायकवाड यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले होते.

माझ्या नातवाने मला इथे आणून सोडले असे तिने पोलिसांना सांगितले होते. त्यांना आपल्या घरचा पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शोध घेतला. तिचा नातू कांदिवलीच्या हनुमान नगर येथे रहात असल्याचे आढळले. आजी आजारी आणि वृध्द असल्याने नातवाने तिला रस्त्यात टाकल्याची कुबली दिली होती. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होत्या. यशोदा गायकवाड या मूळच्या बीड जिल्ह्यातील होत्या. त्या नातवाकडेच राहत होता. मात्र नातवाचीही आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यात आजीला आजार असल्याने त्याने नाईलाजाने तिला रस्त्यात टाकून दिले होते.

नातवासह तिघांवर गुन्हा

ज्येष्ठ नागरिकाला वाऱ्यावर सोडणे किंवा त्याचा पूर्णपणे त्याग केल्याप्रकरणी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायद्याच्या कलम २४ अन्वये तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे ) अंतर्गत नातवासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उत्तन येथील आश्रमात अखेरचा श्वास

यशोदा गायकवाड यांच्यावर कूपर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आजीला भाईंदर जवळील उत्तन येथील आश्रमात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. आपल्या कृत्याबद्दल नातवाने दिलगिरी व्यक्त केली होती. नंतर तो पत्नीसह आजीला भेटायला जात होता. आजीने सर्व विसरून त्याला माफ केले होते. मात्र कर्करोग बळावल्याने नुकतेच आजीचे निधन झाले.