मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत झालेल्या दमदार पावसाने मंगळवारी मुंबई ठप्प झाली. सखलभाग जलमय झाल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शासकिय, निमशासकिय आणि खाजगी आस्थापनांना सुट्टी जाहीर केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. मात्र, तत्पूच कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नोकरदारांना पुन्हा घर गाठावे लागले. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेच्या यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर तैनात करण्यात आल्या होत्या.

मुंबईत मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. सोमवारी कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांचे झालेले हाल लक्षात घेता महापालिकेने मंगळवारी शाळांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला. हवामान विभागाने मुंबईला दिलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने शासकिय, निमशासकिय आणि खाजगी आस्थापनांना सुट्टी जाहीर केली.

मात्र, त्यापूर्वीच अनेकजण घराबाहेर पडले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी परतावे लागले. मात्र अनेक खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग जलमय झाल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तसेच, दादर टिटी, हिंदमाता, शीव, ॲन्टॉप हील, दक्षिण मुंबईत पायधुनी डीडीजंक्शन, काळबादेवी या भागात दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. एम.जी.आर. चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी साचले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. विविध ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवशांना ताटकळत प्रवास करावा लागला.

दरम्यान, सूर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा, भांडूप येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांची जवळच्या एसआरए इमारतींमध्ये तात्पुरती निवाऱ्याची, खानपानाची व्यवस्था करण्यात आली. तसेच, मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना पालिकेतर्फे चहा – पाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मुख्य नियंत्रण कक्षात अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन आयुक्त आदींना समन्वयासाठी पाचारण करण्यात आले होते. तसेच, मध्य रेल्वेची वाहतूक कुर्ला ते सिएसएमटी दरम्यान बंद ठेवण्यात आली होती.

या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या जादा बसेगाड्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आपआपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.मंगळवारी पहाटे ४ ते दुपारी ३ या ११ तासांच्या कालावधीत महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापकाच्या नोंदीनुसार इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी येथे २६८ मिमी, मरोळ अग्निशमन केंद्र येथे २६२ मिमी, पासपोली मनपा शाळा येथे २५७ मिमी, तर अंधेरी अग्निशमन केंद्र येथे २४० मिमी पावसाची नोंद झाली.

पडझडीच्या ४९ घटनामुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरात मंगळवारी झाड, फांद्या पडणे, घर पडणे, भिंत कोसळणे, शॉर्ट सर्किट आदी ४९ घटना घडल्या. त्यात शहर विभागात ८, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात २९ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटनांचा समावेश आहे. तसेच, शहरात ३, पूर्व उपनगरात ५ व पश्चिम उपनगरात २ मिळून एकूण १० ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली.

तसेच एकूण १६ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. त्यात शहरात ९, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरातील २ घटनांचा समावेश होता. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ११ या कालावधीत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला ५०० हून अधिक विविध तक्रारींचे दूरध्वनी प्राप्त झाले होते.