मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘नायगाव बीडीडी पुनर्विकासा’अंतर्गत पाच पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बुधवारी या इमारतींतील ८६४ घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या ८६४ घरांपैकी ४२३ घरे निवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलिसांना देण्यात येणार असल्याने पोलिसांची बऱ्याच वर्षांपासूनची गृहस्वप्नपूर्ती होणार आहे.

मुंबई मंडळाकडून या घरांसाठीचे १५ लाख रुपये रक्कम भरून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव या तीन चाळींत पोलीस निवासस्थाने होती. बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत असताना तिन्ही चाळींतील २,२५० सेवानिवृत्त पोलीस आणि सध्या सेवेत असलेल्या पोलिसांना घरे देण्याची मागणी केली जात होती. यासाठी पोलीस कुटुंबीयांनी आंदोलने केली, मोर्चे काढले आणि न्यायालयीन लढाईही लढली. त्यानंतर २,२५० सेवानिवृत्त पोलिसांसह सेवेत असलेल्या पोलिसांना पुनर्विकासाअंतर्गत ५०० चौ. फुटाचे घर देण्याचा निर्णय झाला. या घरांसाठी १५ लाख रुपये किंमत आकारण्याचे निश्चित झाले आणि तिन्ही चाळींच्या पुनर्विकासाअंतर्गत पोलिसांसाठीही घरबांधणी करण्यात आली.

नायगाव बीडीडी पुनर्विकासाअंतर्गत पाच पुनर्वसित इमारतीतील पूर्ण झालेल्या ८६४ घरांचा सोमवारी निवासी दाखला मिळणार आहे. तर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या घरांचे प्रातिनिधिक स्वरुपात चावी वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई मंडळाकडून सर्व रहिवाशांना प्रत्यक्ष घराचा ताबा दिला जाणार आहे. या ८६४ रहिवाशांमध्ये ४२३ पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मुंबईत पोलिसांना १५ लाख रुपयांत हक्काचे ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे. पुढील टप्प्यात नायगावमधील उर्वरित पात्र पोलिसांना घरे दिली जाणार आहेत.

८६४ घरांचा ताबा : या इमारतीतील ८६४ घरांचा ताबा दिवाळीत देण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे होते. मात्र निवासी दाखला न मिळाल्याने आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने मुहूर्त ठरत नव्हता. आता बुधवारी १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होईल.

पोलिसांना घरे मिळावी यासाठी आम्ही मोठा लढा दिला. आंदोलन केले, मोर्चा काढला, न्यायालयात गेलो. प्रत्येक आमदार, खासदाराला भेटलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधक सगळ्यांना साकडे घातले. अखेर आमच्या लढ्याला यश आले आहे आणि आता नायगावमधील पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे, त्यामुळे आम्ही सर्व पोलीस कुटुंबीय आनंदी आहोत. – रेखा मोरे, नायगाव बीडीडी, पोलीस पत्नी