शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस मोरोन्हा या स्वयंघोषित नेत्याने गोळ्या झाडून हत्या केेली. तसंच त्यानंतर त्याने काही वेळात स्वतःवरही गोळ्या झाडल्या. या घटनेने दहिसर हादरलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्या कारखाली येऊन श्वानाचा मृत्यू झाला तरीही विरोधक माझा राजीनामा मागतील अशी प्रतिक्रिया दिली. त्यावरुन आता जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी राजीनाम्याची केलेली मागणी राजकीय आहे. विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यातही घटना गंभीर आहेच. त्यामुळे राजीनामा मागितला म्हणून मला आश्चर्य वाटत नाही. विरोधी पक्षालाही ही हत्या का झाली? याचे कारण माहीत आहे.

हे पण वाचा- “घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी”, वडेट्टीवार म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी…”

राजाश्रय असलेलेच जिवंत राहणार, पोलिसांचा धाक संपला

महाराष्ट्रात आत्ता जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या आधी निर्माण झाली होती. ज्या कुणाला राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत असे. ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दाढेत ढकलला जायचा. आज पोलिसांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप केला जातो आहे. तसंच पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे होतो आहे. महाराष्ट्रात लोकशाही मूल्यं संपली तर कोण तरुण राजकारणात येईल? सुरक्षित वाटणार नसेल तर आम्ही कशासाठी हे सगळं करतोय? इतकं असुरक्षित वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं. पोलिसांचा एक धाक असे, तो धाक संपला आहे याला जबाबदार सरकार आहे. सरकार कारवाई करत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.

हे पण वाचा- “मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट..”, गोळीबार प्रकरणांवरून जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

देवेंद्र फडणवीस जर माणसाला श्वानाची किंमत देणार असतील तर?

पुणे, मग कल्याण डोंबिवली आता मुंबईत गोळीबार झाला. हसतमुख मुलाचा दुर्दैवी अंत झाला. मॉरिसने स्वतःलाही मारुन घेतलं. बेकायदेशीर बंदुका येतातच कशा? एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बंदुका देशात येतात कशा? १९७० पासून एकही आंतरराष्ट्रीय रिव्हॉल्वर आलेलं नाही. जे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत ते सुरक्षित, बाकींच्या अंत्ययात्रेला यायची तयारी ठेवायची अशी परिस्थिती आहे. फडणवीस जे बोलले ते म्हणजे माणसाच्या मृत्यूला कुत्र्याची किंमत देणार असाल तर आम्ही काय बोलायचं आता?

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If devendra fadnavis is compare man death with dog then what will say ask jitendra awhad scj