मुंबई : उपाशीपोटी रक्तातील साखर (फास्टिंग ब्लड ग्लुकोज), एचबीए १ सी आणि क्रिएटिनिनसारख्या चाचण्यांद्वारे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याचे निदान होते. मात्र या चाचण्यांमधून अचूक परिस्थिती कळत नसल्याने रुग्णांना मूत्रपिंड व अन्य विकारांचा असलेला धोका लक्षात येत नाही.
ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मधुमेहामुळे मूत्रपिंड विकारांचा धोका असलेल्या रुग्णांना ओळखण्यासाठी रक्तातील लहान रेणूंचा (मेटाबोलॉमिक्स) अभ्यास केला. याद्वारे मधुमेहाचे व अन्य विकारांचे निदान लवकर करण्यास मदत झाली. या अभ्यासाचे निष्कर्ष जुलै २०२५ मध्ये ‘जर्नल ऑफ प्रोटीओम रिसर्च’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
भारतामध्ये सुमारे १० कोटी प्रौढ व्यक्ती ‘टाईप २’ मधुमेहाने ग्रस्त असून, १३ कोटी व्यक्तींमध्ये पूर्वमधुमेहाची लक्षणे आढळतात. मधुमेहाचे उशिरा निदान झाल्याने अनेक रुग्णांमध्ये डोळे, हृदय, मेंदू, मज्जातंतू आणि मूत्रपिंड यावर गंभीर परिणाम होतात. जवळपास एकतृतीयांश रुग्णांना दीर्घकालीन मूत्रपिंड विकारही होतो.
त्यामुळे रक्तातील मधुमेहाबरोबरच अन्य विकारांचा धोका वेळीच ओळखता यावा यासाठी वैद्यकीय चाचणी विकसित करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन आयआयटी मुंबईचे प्रा. प्रमोद वांगीकर आणि हैदराबादच्या उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राकेश कुमार सहाय व डॉ. मनीषा सहाय यांच्या नेतृत्वाखालील संशोधक, तसेच पुणे येथील क्लॅरिटी बायो सिस्टिम्स इंडिया प्रा. लिमिटेडच्या संशोधकांनी संशोधन केले. यामध्ये रुग्णांना मूत्रपिंड विकारांमध्ये असलेला गुंतागुंतीचा धोका ओळखण्यासाठी रक्तांमधील लहान रेणूंचा (मेटाबोलॉमिक्स) अभ्यास केला.
जून २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान हैदराबाद येथील उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयातून या अभ्यासासाठी ५२ व्यक्तींचे स्वेच्छेने रक्त नमुने गोळा केले. यामध्ये १५ निरोगी व्यक्ती, ‘टाईप २’ मधुमेहाचे २३ रुग्ण आणि मधुमेह-संबंधित मूत्रपिंड विकाराच्या १४ रुग्णांचा समावेश होता. लिक्विड क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री आणि गॅस क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री या दोन तंत्रांचा वापर करून संशोधकांनी सुमारे ३०० मेटाबॉलाईट्सचे परीक्षण केले.
यामध्ये मधुमेही रुग्ण आणि नियंत्रण गटातील निरोगी व्यक्ती यांच्यात फरक दर्शवणारे २६ मेटाबोलाईट्स आढळले. यामध्ये ग्लुकोज, कोलेस्ट्रॉलसह व्हॅलेरोबेटाइन, रायबोथायमीडिन आणि फ्रुक्टोसिल-पायरोग्लुटामेट यासारखे मेटाबोलाईट्स सापडले. यापूर्वी हे मेटाबोलाईट्स मधुमेहाशी संबंधित मानले जात नव्हते. यावरून मधुमेह केवळ साखरेच्या नियंत्रणाशी संबंधित नसून, चयापचयाच्या विकाराशीही संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रा. प्रमोद वांगीकर यांनी सांगितले.
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांमध्ये सात मेटाबोलाईट्सची पातळी वाढताना दिसली. यात अरॅबिटॉल, मायो-इनोसिटॉल, रायबोथायमीडिन आणि २ पीवाय या शुगर-अल्कोहोल व विषासारख्या संयुगांचा समावेश आहे. या रेणूंचे निरीक्षण करून मूत्रपिंडाच्या गुंतागुंतीचे भाकीत खूप लवकर करू शकतो, असे या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आयआयटी मुंबई येथील पीएच.डी. विद्यार्थिनी स्नेहा राणा यांनी सांगितले.
यापूर्वीच्या बहुतेक अभ्यासात रक्तातील प्लाझ्माचे विश्लेषण करण्यात आले, या संशोधनात संपूर्ण रक्ताच्या नमुन्याचे विश्लेषण करण्यात आले. संपूर्ण रक्ताच्या नमुन्यामध्ये प्लाझ्माव्यतिरिक्त लाल रक्तपेशींमधील मेटाबोलाईट्स देखील ओळखता येतात. यामुळे चयापचयाचे एक वेगळे, परंतु अधिक परिपूर्ण चित्र दिसून येते. बोटाला छोटीशी सुई टोचून काढलेल्या रक्ताच्या वाळलेल्या थेंबांवर आधारित चाचणी विकसित करण्यावर आमचे काम सुरू असल्याचे प्रा. वांगीकर यांनी सांगितले.
