मुंबई : पावसाळी अधिवेशनात दोन मारहाणीच्या घटना तर आमदारांच्या धुळे दौऱ्यात रोख रक्कम आढळणे या अलीकडच्या काळातील तीन घटनांमुळे विधिमंडळ तसेच आमदारांची प्रतिमा मलिन झाली आहे.

आमदार माजल्याची जनभावना झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावल्यानंतर तरी आमदारांच्या वर्तनात बदल होण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते. मारहाणीच्या दोन घटनांमुळे अधिवेशनाचा सारा नूरच पालटला.

पावसळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांबाबत साधकबाधक चर्चा झाली. काही महत्त्वाचे निर्णय सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उभय सभागृहांमध्ये उपस्थित राहून महत्त्वाच्या चर्चांना उत्तरे दिली. लक्षवेधी, प्रश्नोत्तरे या माध्यमातून धोरणात्मक निर्णय जाहीर केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तुलनेत पावसाळी अधिवेशन निर्णय किंवा चर्चेच्या पातळीवर अधिक प्रभावी ठरले होते. पण मारहाणीच्या दोन घटनांमुळे यावर पाणी फिरले. विशेष म्हणजे या अधिवेशनात मंत्र्यांची कामगिरीही तुलनेत चांगली झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कामगिरी सर्वात लक्षवेधी ठरली. सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

मुख्यमंत्रीच जबाबदार : सपकाळ

हाणामारीच्या घटनेने रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी पायश्चित म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यापूर्वी २०१३ मध्ये काही आमदारांनी विधान भवनातील पहिल्या मजल्यावर अधिकाऱ्यांच्या गॅलरीबाहेर पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली होती. याचेही पडसाद राज्यभर उमटले होते. तेव्हा मारहाण करणाऱ्या आमदारांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते.

आव्हाडपडळकर समर्थकांमध्ये मारामारी

अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी झालेल्या मारामारीमुळे विधिमंडळाची पार लयाच गेली. विधिमंडळ परिसरात यापूर्वीही मारामारीचे प्रकार घडले आहेत. या मारामारीनंतर कडक निर्बंध लादण्याचे दोन्ही पिठासीन अधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अधिवेशन काळात हवशेगवशांच्या प्रवेशावर निर्बंध लादण्याचे दोन्ही सभापतींसमोर आव्हान असेल.

संजय गायकवाड यांची कर्मचाऱ्यांना मारहाण

आमदार निवासाच्या उपाहारगृहातील निकृष्ट भोजनाच्या दर्जावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्याने अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचीच चर्चा अधिक झाली. नुसती मारहाण करून गायकवाड थांबले नाहीत तर मारहाणीचे त्यांनी समर्थनही केले ते अधिक चुकीचे होते. आमदाराच्या विरोधात काहीच कारवाई झाली नाही उलट उपाहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला.

आमदारांच्या दौऱ्यात कोट्यवधीची रक्कम

धुळ्यात आमदारांच्या दौऱ्यात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम आढळल्याने आमदारांच्या विरोधात संशयाचे वातावरण तयार झाले. आमदारांना वाटण्यासाठीच ही रोख रक्कम आणण्यात आली होती, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता.

विधिमंडळात किंवा परिसरातील प्रसंग

● जांबुवंतराव धोटे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट भिरकविला होता.

● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेनंतर शिवसेना आमदारांनी विधानसभा सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घालत बाके, माइकची तोडफोड केली होती.

● हिंदीतून शपथ घेण्यास सुरुवात करताच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आझमी यांना २००९ मध्ये मनसेच्या आमदारांनी विधानसभेतच मारहाण केली होती.

● विधान भवनाच्या प्रवेशाद्वारापाशी सत्ताधारी आमदारांना रोखण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या आमदारांनी कडे केले होते. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी युतीच्या आमदारांना ढकलून व धक्काबुक्की केली होती.

● विलासराव देशमुख सरकारच्या विरोधात युतीने मांडलेला अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आल्यावर विधान भवनाच्या बाहेर प्रचंड राडा झाला होता.

● तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिभाषण करण्यासाठी विधान भवनात आगमन होताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांची वाट रोखून धरली होती.

●काँग्रेसचे काही आमदार नारायण राणे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या आसनासमोर चालून आले होते.

●तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही बाजूंचे आमदार भिडले होते.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांनी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांना दालनात शिवीगाळ केली होती.