मुंबई: गणेशचतुर्थीला अजून एक दिवस शिल्लक असला तरी गेला महिनाभर मुंबई आणि आसपासच्या शहरात दर रविवारी आगमन मिरवणुका निघत आहेत. या मिरवणुकांमध्ये ‘भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा’ या गाण्याला सर्वाधिक पसंती मिळत असून सगळीकडे वाजवले जात असल्याचे आढळून आले आहे. गणपतीच्या नेहमीच्या गाण्यांबरोबरच या गाण्याची फर्माईशही होत आहे. त्याच ‘सरगम’ या जुन्या चित्रपटातील ‘रामजी की निकली सवारी’ हे गाणेही मिरवणुकीत वाजविले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणपतीच्या आगमन मिरवणुकांनी गेल्या महिन्याभरातले सगळे शनिवार, रविवार दणाणून सोडले. मुंबई आणि आसपासच्या शहरातील मोठ्या गणेशमूर्तींचे मंडळांमध्ये आगमन आधीच झाले आहे. रविवारी १७ सप्टेंबरलाही काही गणेशमूर्तींचे आगमन पार पडले. या सगळ्या मिरवणुकांमध्ये एका गोष्टीचे साम्य होते ते म्हणजे ‘हर घर मे एकही नाम एक ही नारा गुंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ या गाण्याचे. मिरवणुकीत हे गाणे अनेकदा वाजवले जात असल्याचे आढळून आले.

हेही वाचा… अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटींग अ‍ॅप; पाकिस्तान पाठवलेल्या रकमेबाबत ईडीकडून तपास

गणपतीच्या मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये काही गाणी वर्षानुवर्षे आहेत, तर काही गाणी मागे पडली व नवीन गाणी आली आहेत. चिक मोत्याची माळ, एकदंताय वक्रतुंडाय, देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन हे जुने हिंदी सिनेमातील गाणेही ऑल टाईम फेव्हरेट आहे. मात्र अलीकडे सरगम या जुन्या चित्रपटातील अभिनेता ऋषी कपूरवर चित्रित झालेले ‘रामजी की निकली सवारी’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. या गाण्यात तसा नाचण्यासाठी आवश्यक असलेला ठेका फारसा नसला तरी हे गाणे वाजवून ते एकसूरात म्हणण्याची नवीन क्रेझ तरूणाईत आली आहे.

हेही वाचा… वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना मुंबईत अटक

मुंबई सेंट्रल आणि लोअर परळपर्यंतच्या परिसरात बेंजोचे पथक नेणारे ‘लोअर परळ बिट्स’ या म्युझिकल ग्रुपचे विनायक किर्वे म्हणाले की, मिरवणुकीला सुरूवात होते तेव्हा सुरुवातीला आम्ही ठरवल्याप्रमाणे गाणी वाजवतो. त्यात सुरुवात गणपतीच्या गाण्यांपासून होते. तूच सुखकर्ता, सनईचा सूर, देवा हो देवा ही गाणी वाजवतो, देवाची गाणी वाजवल्यानंतर लोकगीते, कोळीगीते पण वाजवतो. मग थोड्यावेळाने नाचणारे रंगात आले की हिंदी, मराठी चित्रपटांची गाणी वाजवतो किंवा त्यांच्याकडून पण गाणी सुचवली जातात. यंदा मात्र ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ या गाण्याची खूप मागणी आहे. त्यामुळे आम्हीही त्या गाण्याची तालीम केली असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकांपर्यंत सध्या याच गाण्याची चलती असल्याचे तो सांगतो. हे गाणे वाजवताना जिथे ‘जय श्रीराम’ हा शब्द येतो तिथे वाद्य थांबवून मग नाचणारे जोरात ‘जय श्रीराम’ बोलतात. अनेकदा हे गाणे पुन्हा पुन्हा वाजवायला सांगितले जाते, असेही तो म्हणाला.

बेंजोचे पथक चालवणारे कल्पेश साबळे या आणखी एका युवकाने देखील या मुद्द्याला दुजोरा दिला. कल्पेश यांनी आतापर्यंत मुंबईत तीन मंडळांच्या मिरवणुकांमध्ये वाद्य वाजवले आहे. या तिन्ही ठिकाणी ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ या गाण्याला फर्माईश होती, असे त्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ganapati processions ramji ki nikli savari bharat ka baccha baccha jai shriram bolega are the most popular songs mumbai print news dvr