मुंबई: पाच हजार कोटींची उलाढाल असलेल्या महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर अंडरवर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानातही बेटिंग अ‍ॅप चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पाकिस्तानात अ‍ॅप तयार करण्यासाठीची रक्कम भारतातून हवाला मार्फत पाठवण्यात आला असून त्याबाबत सध्या सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करत आहे. चंद्राकरच्या लग्नात भारतातील चित्रपटसृष्टीतील अभिनेते व गायकांप्रमाणे पाकिस्तानतूनही काहीजण सहभागी झाले होते. ते पाकिस्तानातील बेटिंग अ‍ॅपशी संबंधीत व्यक्ती असल्याचा ईडीला संशय आहे.

दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसने १९९९ मध्ये भारतीय गुटखा व्यावसायिकांच्या मदतीने पाकिस्तानात फायर गुटख्याचा कारखाना सुरू केला होता. हे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणाप्रमाणेच २०२१ मध्ये महादेव ऑनलाईन बुक बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तक सौरभ चंद्राकर व भागिदार रवी उप्पल अंडवरर्ल्डच्या मदतीने पाकिस्तानात बेटिंग अ‍ॅप सुरू केल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. पाकिस्तानात स्थानिक नावाने सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपने गेल्या दोन वर्षात मोठी कमाई केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अंडरवर्ल्डकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने चंद्राकरकडे खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी चंद्राकरने त्याला धुडकावून लावले होते. या संपूर्ण प्रकरणात मदत करणारा दाऊद इब्राहिम असल्याचा संशय ईडीला आहे. त्याबाबत सध्या सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा… वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना मुंबईत अटक

ईडीने मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंह, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेता पुलकीत,भाग्यश्री, कीर्ती खबंदा, एली अवराम हे १४ चित्रपट कलाकार सहभागी झाले होते. या कलाकांराशिवाय पाकिस्तानात सुरू करण्यात आलेल्या बेटिंग अ‍ॅपशी संबंधीत व्यक्तीही उपस्थित होते. ते पाकिस्तानातील सट्टेबाज असल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान भारतीय कलाकारांनी या लग्न सोहळ्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी बहुतांश रक्कम रोखीने घेतली आहे. काही जणांनी ८० टक्के रक्कम रोखीने व २० टक्के धनादेशाद्वारे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची सर्व माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कलाकारांना मिळालेली रोख रक्कम हवाला नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना मिळाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीकडे या लग्नाच्या चित्रफीती आहेत. त्याद्वारे तपासणी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानातील अ‍ॅपमध्ये सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक

पाकिस्तानातील बेटिंग अ‍ॅपसाठी ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून पाकिस्तानातील नफ्यातील ३० टक्के अंडरवर्ल्डला व उर्वरीत ७० टक्के चंद्राकर व साथीदारांना मिळत असल्याची माहिती आहे. पाकिस्तानातील गुंतवणूक भारतीय बेटिंग अ‍ॅपच्या नफ्यातून उभारण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ही रक्कम पाकिस्तानात नेण्यासाठी कोणत्या हवाला नेटवर्कला वापर झाला, याबाबत ईडी तपास करत आहे. भारतातील या अ‍ॅपची उलाढाल पाच हजार कोटी रुपयांची आहे. पाकिस्तानातील उलाढालीबाबत सध्या ईडी तपास करत आहे.