मुंबई : गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राबवलेल्या रक्तदान शिबिरांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला असून त्यापाठोपाठ आता नवरात्रोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील महिनाभरामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा काळाबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमुळे रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले. त्यातच यंदा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गणेशोत्सवात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत २३६ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून जवळपास १६ हजार ७९८ बाटल्या रक्त जमा झाले.

गणेशोत्सवामध्ये राज्यात १ लाखांपेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या होत्या. सध्या राज्यामध्ये तब्बल १ लाख ८ हजार २४९ इतका रक्तसाठा असून, मुंबईमध्ये १० हजार ६२६ इतके रक्त उपलब्ध आहे. हे रक्त आवश्यकतेपेक्षाही जास्त आहे. नवरात्रोत्सव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्ताचा साठ्यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

अनेक रक्तपेढ्यांकडे मुबलक रक्तसाठा असतानाही राजकीय दबावामुळे रक्तपेढ्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे रक्त वाया जाण्याबरोबरच त्याचा काळाबाजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमधील रक्तपेढ्यांमधून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची बेकायदा विक्री करून नफा कमवण्यात येतो. रक्ताचा अतिरिक्त साठा तयार झाल्याने या रक्तपेढ्या अधिक माेठ्या प्रमाणात रक्ताची विक्री करण्याची शक्यता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.

रक्तदानाबाबत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती असल्याने नागरिक स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढे येतात. मात्र अन्य राज्यांमध्ये रक्तदानाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे तेथील रक्तपेढ्यांना रक्त संकलित करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त रक्त संकलन होणार नाही व रक्त मुदतबाह्य होऊन ते वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना रक्तपेढ्यांना दिल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नोव्हेंबरमध्ये रक्ताच्या तुटवड्याची शक्यता

रक्ताची आयुमर्यादा ३५ दिवसांची असते. त्यामुळे गणेशोत्सवात संकलित रक्त दसऱ्यापर्यंत, तर पुढील १० दिवसांमध्ये संकलित होणारे रक्त ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरता येणार आहे. त्यामुळे बरेच रक्त वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच एकदा रक्तदान केल्यानंतर पुढील तीन महिने संबंधित व्यक्तीला रक्तदान करता येत नाही. परिणामी दिवाळी व नोव्हेंबरमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • महाराष्ट्र – १,०८,२४९
  • पुणे – १५,४८५
  • मुंबई – १०,६२६
  • सोलापूर – १०,४७७
  • कोल्हापूर – ६४६९
  • सांगली – ४००८ नाशिक – ३५१९