मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत तसेच खास स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच २०२४ सालासाठीचा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर २०२४ सालासाठीचा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज. कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

येथे मिळणार विनामूल्य प्रवेशिका

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर, दादरमधील श्री शिवाजी नाट्यमंदिर, दादरमधील मुंबई मराठी साहित्य संघ, विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे निमंत्रण पत्रिका विनामूल्य उपलब्ध असतील.