मुंबई : जून ते ऑगस्टमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टो, हेपेटायटीस व अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना सप्टेंबरच्या १५ दिवसांमध्ये या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यास या रुग्णांच्या संख्येतही घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईत पावसाच्या अनिश्चित स्वरुपामुळे मागील जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. जोरदार पाऊस व बराच दिवस पाऊस घेत असलेली उघडीप यामुळे हिवताप, डेंग्य, चिकुनगुन्यासारख्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे जून ते ऑगस्ट या महिन्यांत हिवतापाचे सर्वाधिक ३ हजार ७७३ रुग्ण सापडले. त्याखालोखाल अतिसाराचे २ हजार १९७, डेंग्यूचे १ हजार ९७९, लेप्टोचे २३७८, चिकुनगुन्या ३७०, हेपेटायटीस ४५१ रुग्ण सापडले. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस कमी झाल्याने या आजारांना प्रतिबंध करणे शक्य असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
जून ते १५ सप्टेंबरपर्यंतची रुग्णसंख्या
हिवतापाचे जूनमध्ये ८८४ रुग्ण सापडले होते. जुलैमध्ये १ हजार २९४, तर ऑगस्टमध्ये १ हजार ५५५ आणि १५ सप्टेंबरपर्यंत ५७१ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे डेंग्यूचे जूनमध्ये १०५, जुलैमध्ये ७०८, ऑगस्टमध्ये १ हजार १५९ आणि १५ सप्टेंबरपर्यंत ४०५ रुग्ण सापडले आहेत. चिकुनगुन्याचे जूनमध्ये फक्त २१ रुग्ण, जुलैमध्ये १२९, ऑगस्टमध्ये २२० आणि १५ सप्टेंबरपर्यंत ५७ रुग्ण सापडले आहेत. लेप्टोचे जूनमध्ये ३६, जुलैमध्ये १४३, ऑगस्टमध्ये २२७ आणि १५ सप्टेंबरपर्यंत ८७ रुग्ण सापडले. हिपेटायटीसचे जूनमध्ये ७८, जुलैमध्ये १७६, ऑगस्टमध्ये १९७ आणि १५ सप्टेंबरपर्यंत १०३ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे अतिसाराचे जूनमध्ये ९३६, जुलैमध्ये ६६९, ऑगस्टमध्ये ५९२ आणि १५ सप्टेंबरपर्यंत २१५ रुग्ण सापडले आहेत.
काय काळजी घ्याल
हिवताप, डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी घरामध्ये, घराच्या आसपास कोठेही पाणी साचणार याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात तसेच जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर अशा अडगळीतील वस्तूंमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करावा. लेप्टोच्या प्रतिबंधासाठी पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येणे टाळा.
गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून प्या. तसेच नागरिकांनी ताप आल्यास घराजवळीला महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी केले आहे.