मुंबई : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर अलगदपणे चंद्रयान उतरले आणि आणि भारताची चंद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाली, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. या सर्व घटनांचे पडसाद मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात दिसत आहेत. मंडळांनी या घटनांवर आधारित देखावे साकारले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही राममंदिराच्या प्रतिकृती साकारण्यास मंडळांनी पसंती दिली आहे, तसेच श्रीरामरूपी गणेशमूर्तीही घडविण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकारला आहे. हे मंडळ यंदा ९० वे वर्ष साजरे करीत आहे. गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडची प्रतिकृती साकारलेली आहे. गिरणगावातील जुन्या मंडळांपैकी एक असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची गणेशमूर्ती यंदा ‘श्रीराम रूपी’ अवतारात आहे.

हेही वाचा : वाघाचे कातडे विकणाऱ्या महाबळेश्वरच्या तिघांना मुंबईत अटक

‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ या नावाने हा गणपती ओळखला जात असून हे मंडळ यंदा शतकोत्तर चतुर्थ वर्ष साजरे करीत आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार करण्यात आलेला लालबागमधील ‘राजा तेजुकायाचा’ही यंदा ‘श्रीराम रूपी’ अवतारात आहे. गिरगावातील खेतवाडी ११ वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती तब्बल ४५ फुटांची आहे. ‘चंद्रयान – ३’ मोहिमेचे देखावेही अनेक मंडळांनी साकारले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशोत्सवावरही या ऐतिहासिक घटनांची छाप पडलेली पाहायला मिळत आहे. घरगुती गणेशमूर्तीही रामाच्या रुपात दिसत आहेत.

हेही वाचा : पुण्याची पोटनिवडणूक टाळण्यासाठी नियमालाच बगल

३६०.४० कोटींचे विमा संरक्षण

मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून किंग्स सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण म्हणजेच ‘जीएसबी’ सेवा मंडळाचा गणपती ओळखला जातो. यंदा गणेशमूर्ती ६६.५ किलोग्रॅम सोन्याचे दागिने आणि २९५ किलोग्रॅम चांदी तसेच इतर मौल्यवान वस्तूंनी सजलेली असेल. मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे. सुरक्षा व्यवस्थापनाचा भाग म्हणून मंडपात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रथम दर्शनी चेहरा कैद करणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर भाविकांसाठी पूजा आणि इतर सेवांसाठी मंडळाकडून ‘क्यू आर कोड’ स्कॅनिंगची व डिजिटल लाईव्ह यंत्रणा सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai ganesh mandals decoration of chandrayaan 3 shiv rajyabhishek sohla and ram mandir for ganeshotsav 2023 mumbai print news css