मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे शनिवार, २१ जून रोजी संपूर्ण मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य योग सत्रासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागामार्फत गोकुलदास तेजपाल सभागृह, ऑगस्ट क्रांती मैदानजवळ, ग्रॅंट रोड (पश्चिम) येथे योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे सत्र सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होईल. दरम्यान, यंदा योग दिनाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्य, आरोग्यासाठी योग’ अशी आहे.

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध सेवा सतत उपलब्ध करून दिल्या जातात. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवार, २१ जून रोजी पालिकेच्या २५ विभागांत वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी, तसेच स्थानिक नागरिकांसाठी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य योग सत्रासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागामार्फत गोकुलदास तेजपाल सभागृह, ऑगस्ट क्रांती मैदानजवळ, ग्रॅंट रोड (पश्चिम) येथे सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत हे योग सत्र आयोजित करण्यात आले आहे.

पालिकेच्या व्हॉट्स ॲप चॅटबॉटवर माहिती

मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्स ॲप चॅटबॉटवर नागरिकांना त्यांच्या परिसरातील जवळच्या शिव योग केंद्राबाबत अद्ययावत व सविस्तर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या व्हॉट्स ॲप चॅटबॉटवर शिव योग केंद्राची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये योग सत्रांची वेळ, स्थळ, आदी माहिती मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. या सुविधेमुळे अधिकाधिक नागरिकांना योगाभ्यासाची योग्य माहिती प्राप्त होण्यास मदत होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.