लोकलमधील अपंगांच्या डब्यात अन्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई असतानाही काही प्रवासी यातून सर्रासपणे प्रवास करतात. अशा घुसखोरांविरोधात मध्य रेल्वे सुरक्षा दलाने नियमित कारवाईबरोबरच विशेष मोहीम आणि व्हॉट्सअ‍ॅप गटावरील माहितीच्या आधारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये ८ हजार ८१९ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली असून एकूण २९ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. ही घुसखोरी अधिकच वाढल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.

हेही वाचा- ‘एअरबस-टाटा’ प्रकल्पही गुजरातमध्ये!; नागपूरमध्ये २२ हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असफल

लोकलमध्ये अपंगांसाठी डबे आरक्षित असतात. त्या डब्यातून सामान्य प्रवाशांना प्रवास करता येत नाही. तरीही काही प्रवासी अन्य डब्यात असलेली गर्दी पाहून अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात. अनेकदा अपंगांच्या डब्यातील प्रवासी त्याला विरोधही करतात. अशावेळी वादही होतात. याविरोधात रेल्वे सुरक्षा दल व तिकीट तपासणीसांकडून विशेष मोहीम घेऊन कारवाई केली जाते. परंतु पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येते.

यातून आणखी एक मार्ग काढून अपंग प्रवासी आणि मध्य रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांनी मिळून व्हॉट्सअ‍ॅप गट (ग्रुप) तयार केला आहे. याद्वारे लोकल डब्यात घुसखोरी करणाऱ्यांचा फोटो, स्थानक इत्यादी माहिती पाठवल्यास या गटात असलेले रेल्वे सुरक्षा कर्मचारी संबंधित स्थानकातील सुरक्षा दल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात व कारवाई करण्यात येते. या व्हॉटसअ‍ॅप गटात दिव्यांग प्रवासी सदस्य आहेत. हा गट २०२० मध्ये तयार करण्यात आला.

हेही वाचा- जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीची उच्च न्यायालयात धाव; बालप्रसाधन उत्पादन परवाना रद्द करण्याला स्थगिती देण्याची मागणी

करोनानंतर वाढलेल्या गर्दीमुळे अपंगांच्या डब्यात घुसखोरी वाढली आहे. २०२१ या वर्षात १ हजार ४२९ घुसखोरांवर कारवाई करण्यात आली तर ३ लाख ९० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. जानेवरी ते ऑक्टोबर २०२२ मध्ये ८ हजार ८१९ घुसखोर प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून २९ लाख ७२ हजार ९४३ रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. अपंगांच्या डब्यात घुसखोरी वाढली असून मोठया प्रमाणात तक्रारी येत असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांनी दिली. व्हॉट्स अँप वरही या तक्रारी येत असून त्याप्रमाणे कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. काहीजण नाईलाज म्हणून तर काही प्रवाशांना याबाबत अपुरी माहिती असल्यानेही घुसखोरी होते.

हेही वाचा- ‘आरे’त आणखी एका बिबट्याचा वावर; ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध सुरु

घाटकोपर, कुर्ला, विक्रोळी, दादर, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, वाशी, पनवेल, वडाळा स्थानकात अपंगांच्या डब्यात घुसखोरांकडून प्रवेश करण्याचे प्रमाण अधिक आहे. अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसाविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या चार वर्षापासून मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलच्या दिव्यांग डब्यात कॅमेरा बसविण्यास सुरुवात केली. मात्र हे काम रखडले आहे.