मुंबई : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेत्रातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ निमित्ताने भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
गोरेगावमधील नेस्को संकुल येथे सोमवारी आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घघाटन मंत्री शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझी, केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि केंद्रीय सचिव विजय कुमार उपस्थित होते.
‘गेटवे ऑफ इंडिया’ आता ‘गेटवे ऑफ द वर्ल्ड’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताचा ११ हजार किलोमीटरचा किनारा आता जागतिक विकास केंद्र होत आहे. भारतीय सागरी क्षेत्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (‘जीडीपी’) ६० टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. आज इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत पुन्हा आपली सागरी ताकद सिद्ध करत असून जहाजबांधणीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर असल्याचे शाह म्हणाले.
देशातील ९० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. २०४७ पर्यंत जागतिक सागरी नेतृत्व प्राप्त करण्याचे भारताचे ध्येय आहे. वाढवण बंदर लवकरच जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये गणले जाईल. ग्रेट निकोबार व कोचिन बंदरात नव्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी भारताच्या सागरी क्षेत्रात सहभागी होऊन समृद्धीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन शाह यांनी केले.
गेल्या दशकात भारताची बंदर क्षमता २,७०० दशलक्ष मेट्रीक टन, मालवाहतूक १,६४० दशलक्ष मेट्रीक टन तर अंतर्गत जलमार्गांचा मालवाहतूक ६.९ दशलक्ष मेट्रीक टनावरुन १४५ दशलक्ष मेट्रीक टनावर गेली आहे. भारतीय खलाशांची संख्या २०० टक्क्यांनी वाढून ३.२ लाख झाली आहे, असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नमूद केले. ३१ ऑक्टोबर रोजी परिषदेचा समारोप आहे.
महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सागरी ताकदीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. मुंबई पोर्ट आणि जेएनपीए देशाच्या कंटेनर वाहतुकीत मोठी भूमिका बजावत आहेत. सागरी व्यापारामध्ये मुंबईसह, महाराष्ट्रातील बंदरांची भूमिका महत्वाची राहिली आहे. यातूनच मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला. महाराष्ट्र देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू आहे, असे सांगून या प्रवासात गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाढवण बंदराचे बांधकाम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील महत्वाच्या आणि पहिल्या दहा बंदरापैकी एक असेल. वाढवण मुळे भविष्यात महाराष्ट्रासोबतच भारत सागरी शक्तीच्या रूपात उदयास येईल. या बंदराच्या उभारणीमुळे सागरी क्षेत्रात, त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक संधी निर्माण होतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
