मुंबई : देशात एपिलेप्सीविषयी जागृती वाढण्याची गरज अधिकाधिक प्रकर्षाने समोर येत आहे. मेंदूतील अचानक होणाऱ्या विद्युत असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या झटक्यांमुळे रुग्णांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असताना, भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख नवी प्रकरणे नोंदली जातात. बहुतेक प्रकरणांमध्ये आजाराचे नेमके कारण शोधलेले नसल्याने उपचार आणि व्यवस्थापनात अडथळे निर्माण होत आहेत.
भारतात सध्या एक कोटीपेक्षा अधिक लोक एपिलेप्सीने प्रभावित असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. औषधोपचाराने सुमारे ७० टक्के रुग्णांमध्ये झटके नियंत्रणात येतात, मात्र उपचारातील सातत्य, औषधांचा नियमित पुरवठा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता यामुळे अनेक रुग्ण योग्य उपचारांपासून दूर राहतात. ग्रामीण भागात याबाबतच्या ज्या चाचण्या आहेत म्हणजे इइजी व एमआरआय सारख्या निदान तंत्रज्ञानाची उपलब्धता कमी असल्याने झटके विकाराचे अचूक निदान होत नाही असेही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
महाराष्ट्राची परिस्थितीही विशेष वेगळी नाही. राज्यात आठ ते दहा लाखांदरम्यान रुग्णसंख्या असल्याचा अंदाज असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांमध्ये प्रगत उपचार सुविधा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागात उपचाराची तूट प्रकर्षाने जाणवते. जिल्हा रुग्णालयांत इइजी सुविधा वाढत असल्या तरी प्रशिक्षित तंत्रज्ञ व न्युरोलॉजिस्टची गरज कायम आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोडियम वॉल्प्रोएट, कार्बामाझेपीन, फिनायटोइन यांसारखी औषधे उपलब्ध असली तरी पुरवठ्याचा सातत्यपूर्ण अभाव रुग्णांसाठी अडचणीचे ठरत आहे.
एखाद्या व्यक्तीचे दैनंदिन जीवन अगदी शांतपणे पुढे जात असतानाच अचानक मेंदूतील विद्युत प्रवाहाचे संतुलन बिघडत आणि क्षणभरात सर्वकाही बदलते. हा आहे एपिलेप्सीचा अनपेक्षित, अनेकदा भेदक वाटणारा अनुभव. देशात लाखो लोकांना भेडसावणारा हा आजार आजही अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंकाच्या छायेखाली दडलेला आहे.एपिलेप्सीची भीती ही आजारापेक्षा जास्त समाजाच्या कल्पनांमधून निर्माण होते. जुनाट समज, ‘झटके’ म्हणजे वेगळेपणा, भीतीदायक लक्षण किंवा कमतरता या सगळ्यांनी रुग्णांभोवती अकारण भिंती उभ्या केल्या. रोजगार, शिक्षण, विवाह, सार्वजनिक जीवन सर्व पातळ्यांवर त्यांना अदृश्य अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
एपिलेप्सी असणारे लोक हे फक्त ‘सफरर्स’ नाहीत, तर ते खरे लढवय्ये आहेत, असे न्युरोलॉजिस्ट सतत सांगतात. औषधोपचार हा या आजाराचा मुख्य आधार असला तरीही सर्व रुग्णांमध्ये झटके पूर्णपणे थांबत नाहीत. शिवाय, औषधांचे दुष्परिणामही त्यांच्या जीवनगुणवत्तेला काहीवेळा मारक ठरतात.
या पार्श्वभूमीवर तज्ञांचा आग्रह आहे.एपिलेप्सीविषयीचे शास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणे हीच सर्वात मोठी गरज. शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे याठिकाणी जागृती कार्यक्रम राबवणे, रुग्णांना सामाजिक पाठबळ देणे आणि कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन करणे हे आजच्या काळाचे प्राधान्य ठरणार आहे.एपिलेप्सीविषयीचा सामाजिक कलंक हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. शिक्षण, विवाह आणि रोजगाराच्या पातळीवर रुग्णांना अद्यापही भेदभावाला सामोरे जावे लागते. अनेक कुटुंबे झटके येणे हे अंधश्रद्धांशी जोडतात, ज्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळत नाही.राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एपिलेप्सीचा समावेश असला तरी शाळा आणि कार्यस्थळांवर जागृती अभियानांची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.एपिलेप्सी ही लपवण्यासारखी अवस्था नाही. योग्य उपचार आणि सामाजिक पाठबळ मिळाल्यास रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात, असे न्युरोलॉजिस्टचे म्हणणे आहे.एपिलेप्सी विषयीच्या गैरसमजांना छेद देऊन उपचारसुविधांचा विस्तार आणि जागृती वाढविणे हीच पुढील काळातील आरोग्य व्यवस्थेची मोठी जबाबदारी ठरणार आहे.
