मुंबई : साईनगर शिर्डी – तिरुपतीदरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेगाड्यांमुळे दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे परस्परांशी जोडणी जाणार असून, साईबाबा आणि वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची संधी प्रवाशांना मिळणार आहे.
साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या १८ फेऱ्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०७६३८ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर सोमवारी ४ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ७.३५ वाजता साईनगर शिर्डी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७६३७ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर रविवारी ३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या कालावधीत पहाटे ४ वाजता तिरुपती येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला कोपरगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, सेलू, परभणी, गंगाखेळ, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भाळकी, बीदर, झहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनपल्ले, तेनाली, चिराला, ओंगोल, गुडूर आणि रेणिगुंटा येथे थांबा देण्यात येईल.
या रेल्वेगाडीची रचना २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी असेल. या विशेष रेल्वेगाडीच्या आरक्षणाची सुविधा १ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगावदरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या धावणार.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगावदरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वेगाड्याव्यतिरिक्त या ६ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या ३०२ वर पोहोचली आहे.
गाडी क्रमांक ०१००३ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून २४ आणि ३१ ऑगस्ट, ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा दिला जाईल.
या रेल्वेगाडीची रजना १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी असेल. या रेल्वेगाडीचे आरक्षण ५ ऑगस्ट पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.