मुंबई : तंत्रशुद्ध फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कल्पक कर्णधार, वलयांकित क्रिकेटपटू, शेती-मातीत रमणारा साधा माणूसङ्घ अजिंक्य रहाणेच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने बुधवारी मुंबईत सादर होतील. वलयवर्तुळात राहूनही अजिंक्य इतका साधेपणा कसा जपतो, फलंदाजीमध्ये परदेशी मैदानांवर विशेषत्वाने कसा तळपतो, कोणत्याही आव्हानासमोर अविचल नेतृत्वगुण कसे दाखवतो, व्यग्र कार्यक्रमातही शेतीसारख्या विषयात रस कसा घेतो अशा अनेक प्रश्नांची उकल या संवादातून होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केसरी टूर्स सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर लागू बंधू असून, बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड हे आहेत. कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव आहे. क्रिकेटप्रेमी ज्येष्ठ रंगकर्मी विनय येडेकर आणि ‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर अजिंक्यशी संवाद साधतील.

मूळच्या डोंबिवलीकर अजिंक्य रहाणेने मुंबई क्रिकेटमध्ये विविध वयोगटांत नैपुण्य मिळवले. पुढे मुंबईसाठी रणजी हंगामात सातत्याने कामगिरी करत अजिंक्यने भारतीय संघात स्थान मिळवले आणि पक्के केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा ‘अजिंक्यतारा’ तळपला. परदेशी मैदानांवर सातत्याने धावा करणारा, अशीही त्याची ठळक ओळख आहे. फलंदाजीइतकीच नेतृत्वातही अजिंक्यने संधी मिळेल तशी आणि तेव्हा चमक दाखवली. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील भारताच्या दिमाखदार मालिका विजयाचा अजिंक्य एक सूत्रधार होता.

क्रिकेटप्रमाणेच शेती, माती, शेतकरी यांच्याविषयी त्याला विलक्षण जिव्हाळा वाटतो. शेतकरी कुटुंबातून आल्याची जाणीव आणि अभिमान अजिंक्यपाशी आहे. शेती आणि शेती तंत्रज्ञानाशी संबंधित नवउद्यमींना त्याने गुंतवणुकीच्या माध्यमातून मदत केली आहे.

‘लोकसत्ता गप्पा’तील आजवरचे मान्यवर

विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अनौपचारिक संवादसेतूच्या माध्यमातून विचारसंचित जोडणे हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमाचा एक हेतू आहे. या वाचकप्रिय उपक्रमात आजवर विख्यात साहित्यिक-विचारवंत एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक व संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे, अभिजात गायक पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-गीतकार व विचारवंत जावेद अख्तर, चिंतनशील अभिनेते नसिरुद्दीन शहा, कवी-गीतकार गुलजार, रंगरेषाकार सुभाष अवचट, गानविदुषी प्रभा अत्रे, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, प्रयोगशील शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान, विख्यात क्रिकेट समालोचक-संवादक हर्ष भोगले, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली असे प्रतिभावंत सहभागी झाले आहेत.

सहप्रायोजक: केसरी टुर्स
पॉवर्ड बाय :लागू बंधू
बँकिंग पार्टनर :ठाणे भारत सहकारी ,बँक लिमिटेड

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with ajinkya rahane in loksatta gappa amy