मुंबई : वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण २६१ जर्सीं चोरी गेल्याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम खान याच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही घटना १३ जून २०२५ रोजी घडली होती. याप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमांग भारतकुमार अमीन (४४) हे महिम येथे राहतात आणि वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीन यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी फरुख असलम खान (४६), मीरारोड (पूर्व) येथील गौरव एक्सेलन्सी येथील रहिवासी असून सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याने बीसीसीआयच्याच्या अधिकृत स्टोअरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून मुंबई इंडियन, दिल्ली कॅपिटल, सन रायझर्स हैद्राबाद, कोलकाता नाईट राईडर्स, गुजरात, राजस्थान व चेन्नई अशा विविध संघांच्या मिळून २६१ जर्सी चोरल्या. त्यांची किंमत सहा लाख ५२ हजार रुपये आहे.
तक्रारीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण आणि इतर संबंधित पुरावे तपासले जात आहेत. याप्रकरणी इतर आरोपींच्या सहभागाबाबत पोलीस तपास करत आहेत.