मुंबई : महाविकास आघाडीने दिलेला लोकसभेच्या तीन जागांचा प्रस्ताव फेटाळल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही वंचित आणि ‘मविआ’मध्ये सहमती होण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, ‘मविआ’तील तीन प्रमुख पक्षांतही जागावाटपावरून मतभेद कायम असून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबईत झालेल्या चर्चेतही तोडगा निघाला नसल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतविभागणी केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला काही जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या दोघांसह शिवसेना-उद्धव गटाच्या ‘मविआ’मध्ये वंचितलाही स्थान देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांशी आघाडीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सुरुवातीपासूनच साशंक होते. वंचित स्वतंत्र लढल्यास किती नुकसान होऊ शकते याचा आढावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. काही मतदारंसघांमध्ये फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते.  महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पण वंचितच्या वतीने चर्चेला वेगळेच वळण दिले जात असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, महाविकास आघाडीने अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव आम्हाला दिला होता. तो आम्ही प्रस्ताव फेटाळल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच वंचितने सहा जागांची मागणी केलेली नाही, असा खुलासाही करण्यात आला. वंचितला तीन जागा देण्याची महाविकास आघाडीची तयारी होती. पण वंचितने त्याला नकार दिल्याने त्यांची त्यातून भूमिका स्पष्ट होते, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ‘आम्ही त्यांना जागांचा प्रस्ताव दिला, पण त्यांची भूमिका वेगळी दिसते,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर दिली.

हेही वाचा >>>जागावाटपात शिवसेना, राष्ट्रवादीकडून काँग्रेसची कोंडी; महाविकास आघाडीत पाच जागांवरून तणाव

जागावाटप लांबणीवर

जागावाटपासंदर्भात ‘मविआ’ची बैठक गुरुवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. मात्र, ठोस तोडगा निघू न शकल्याने आघाडीचे जागावाटप लांबणीवर पडले आहे.  शिवसेना व राष्ट्रवादीच्या विशिष्ट जागांसाठी हट्ट धरण्याच्या भूमिकेवर काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत आहे. सांगली, रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, भिवंडी, अमरावती आणि वर्धा या मतदारसंघांवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is clear on behalf of the vanchit bahujan aghadi that the maha vikas aghadi has rejected the proposal of three lok sabha seats amy