मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला अद्यापही जैन समुदायाकडून विरोध होत आहे. यापुढे कबुतरांना न्याय देण्यासाठी कोणती रणनीती आखायची, हे ठरविण्यासाठी दादर येथे ११ ऑक्टोबर रोजी धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे.
कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार, राज्य शासनाने कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. त्यांनतर, महापालिकेने कबुतरखान्यांविरोधातील कारवाई सुरु केली.
दरम्यान, दादरमधील कबुतरखान्यावरील कारवाई विरोधात जैन समुदायाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वाद चिघळला. त्यानंतर आतापर्यंत कबुतरखाने पुन्हा सुरु व्हावेत, यासाठी जैन समुदाय विविध प्रयत्न करत आहे. अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने जैन समुदायाने येत्या ११ ऑक्टोबर रोजी दादर येथील योगी सभागृहात धर्म सभा आयोजित केली आहे.
सकल जैन समाज, महावीर मिशन ट्रस्ट, शेरी ऍन्ड दिया फाउंडेशन, कुलाबा सकल जैन संघ, जैन इंटरनॅशनल सेवा ऑर्गनायझेशन फाउंडेशन आदी संस्था या सभेत सहभागी होणार आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. कबुतरखाने बंद झाल्यापासून हजारो कबुतरांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी सभेत प्रार्थना करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
केवळ कबुतरांमुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला नाही. अन्य प्राण्यांमुळेही त्यांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. मात्र, केवळ कबुतरांवरच अन्याय का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. तसेच, हिंदू धर्मात गाईंना जसा मान आहे, तसाच जैन धर्मात कबुतरांना आहे. त्यामुळे कबुतरांना न्याय मिळालाच पाहिजे. यापूर्वी अनेक वेळा याबाबत प्रयत्न करण्यात आले.
पर्युषण काळात सरकारने कबुतरखान्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आता धर्म सभा आयोजित करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. प्रश्न सुटला नाही तर दिवाळीनंतर आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात येईल, अशी माहिती माजी नगरसेवक पुरण दोशी यांनी दिली.
कबुतरांच्या विष्ठेतून आजार पसरत असतील तर महापालिकेने दिवसातून तीन ते चार वेळा कबुतरखान्यांची स्वच्छता करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले पाहिजेत. मुंबईकर त्यासाठी पालिकेला कर देतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी शेरी ऍन्ड दिया फाउंडेशनचे राकेश कोठारी, जिसो फाउंडेशनचे सुरेश पुरनिया, महेंद्र जैन, निलेश चंद्रमुनी आदी उपस्थित होते.