लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘समुद्री बिलोरी ऐना… सृष्टीला पाचवा महिना’ अशा शब्दांत कविवर्य बा. भ. बोरकर यांनी ज्याचे वर्णन केले, तो श्रावण महिना अनेक अर्थाने मनाला मोहून टाकणारा आहे. एकीकडे आकाशीचा घननिळा रंग, निसर्गाने ल्यायलेला पाचूचा हिरवा रंग असे श्रावणातले कैक रंग आपल्या मनात उत्साहाची रुजवात करतात, तर दुसरीकडे श्रावणातली सणांची लडी, त्यानिमित्ताने सुरू होणारे उपवास आणि खास पदार्थांची जिभेवर रेंगाळणारी चव, मंगळागौरीसारख्या पारंपरिक खेळात दंग होणारे मन अशा अनोख्या आनंद सोहळ्याने वातावरण मंत्रमुग्ध झालेले असते. या मनभावन ऋतूचे हे इंद्रधनुषी रंग अनुभवण्याची संधी ‘श्रावणरंग’ या ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

श्रावण म्हणजे निसर्गाचे मनोहारी रूप. कधी बरसणारा पाऊस तर कधी सोनेरी उन्हाची झळाळी. कधी पाऊस गाण्यांतून, कधी कवितांमधून, कधी सणांच्या निमित्ताने केलेल्या पारंपरिक साजशृंगारातून, तर कधी नाच गं घुमा म्हणत थिरकणाऱ्या पावलांमधून आनंद रिमझिमत राहतो. श्रावण महिन्याचे हे सगळे आनंदाचे, मौजमजेचे सारे क्षण एकाच वेळी अनुभवण्याची संधी ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. ठाणे, दादर, वाशी, कल्याण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा सहा विभागांत हा कार्यक्रम रंगणार

आहे. श्रावण महिन्याची सुरुवातच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारख्या सणांनी होते. या सणवारांच्या निमित्ताने खास श्रावणातील उपवासाचे पदार्थ, गोडाधोडाचे पदार्थ, काही पारंपरिक प्रांतीय पदार्थ घरोघरी निगुतीने केले जातात. अशा श्रावणातील खास पदार्थांची पाककृती सादर करत बक्षिसे मिळवण्याची संधी या कार्यक्रमातील पाककला स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.

श्रावणातील याच सणवारांची रेलचेल आणि मराठमोळा साजशृंगार यांचेही घट्ट नाते आहे. या सणांच्या निमित्ताने खास ठेवणीतले पोशाख, साड्या, पारंपरिक दागिन्यांचा साज याची जय्यत तयारी केली जाते. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात सण साजरे करण्याची पद्धत वेगळी, तसेच त्या त्या प्रांतातील भौगोलिक- सामाजिक वातावरणाप्रमाणे येथील विविध समाजांच्या पेहरावातही वैविध्य आढळून येते. असा पारंपरिक मराठमोळा पेहराव करून बक्षिसे लुटण्याची संधी देणारी ‘मराठमोळा साजशृंगार’ ही स्पर्धाही या कार्यक्रमात होणार आहे. तसेच मंगळागौरीच्या खेळाचे सादरीकरण आणि पाऊसगाण्यांच्या चिंब स्वरांमध्ये न्हाऊन निघण्याचा आनंदही ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमातून घेता येणार आहे. या हिरव्या ऋतूचा बरवा आनंद लुटण्यासाठी ‘लोकसत्ता श्रावणरंग’ या कार्यक्रमात सहभाग कसा घ्यायचा ते या कार्यक्रमांचे ठिकाण, तारखा आदी तपशील लवकरच ‘लोकसत्ता’तून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.

प्रायोजक

● सहप्रायोजक : सोनी मराठी, पितांबरी रुचियाना, सोसायटी टी, एम. के. घारे ज्वेलर्स, ब्रह्मविद्या साधक संघ, युनियन बँक ऑफ इंडिया, रिजन्सी ग्रुप

● पॉवर्ड बाय : वीणा वर्ल्ड

● इव्हेंट पार्टनर : मी मंत्रा