कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. बोम्मई यांच्या वक्तव्याचा राज्यातील विविध स्तरांमधून निषेध नोंदवण्यात येत आहे. मुंबईच्या माहिम बसस्टॉपवर बोम्मई यांच्या पोस्टरवर काळी शाई फासण्यात आली आहे. ‘कर्नाटक नव्याने पाहुया’ या आशयाच्या कर्नाटक सरकारच्या जाहिरातीच्या पोस्टरवर अज्ञातांनी शाई फासली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसवराज बोम्मईंविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून नुकतंच तीव्र आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शिवसैनिकांनी बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. कर्नाटकच्या काही बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहूनदेखील राज्यात आंदोलन करण्यात आले.

विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटमधील ४० गावांवर दावा केला आहे. या दाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राची अवहेलना होत आहे”, अशी टीका ठाकरेंनी केली आहे. तर कर्नाटकातील भाजपा सरकारचा हा आगाऊपणा खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहल्याने बोम्मई संतापले; म्हणाले, “सरकारने ही आंदोलन थांबवावी अन्यथा…”

दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर महाराष्ट्र-सोलापूर सीमाप्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “बोम्मई किंवा अन्य कोणीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नसून आम्ही न्यायालयात लढू आणि महाराष्ट्राची गावे परत मिळवू. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह अन्य गावांवरही महाराष्ट्राचा दावा असून आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयापुढे मांडली आहे. याबाबत पुरावेही सादर केले आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka cm basavaraj bommais poster was smeared with black ink at mumbais mahim bus stop rvs