भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब म्हणायचं. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर ३ बायका करून त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव दिल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल.”

“रोहित पवारांच्या माफीला कोण विचारतं”

रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केल्यास माफ करणार नाही असं म्हटलं. त्यावर किरीट सोमय्या यांनी रोहित पवारांच्या माफीला कोण विचारतं असं उत्तर दिलं. “आज माफी मागण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आहे. अजित पवार यांनी आपल्या ताई, आपली माई, आपली आई, आपली पत्नी, आपले पुत्र यांच्या नावावर बेनामी संपत्ती उभी केली,” असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले.

हेही वाचा : “‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’ म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“अजित पवार यांची १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त झाली. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार अथवा पार्थ पवार कुणीही असो यांनी खूप वर्ष महाराष्ट्राला बनवलं, फसवलं, लुटलं. आत्ता तर हिशोब द्यावा लागेल,” असं म्हणत सोमय्या यांनी पवार कुटुंबाला इशारा दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiriti somaiya allegations on ajit pawar dhananjay munde pbs