शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही,” असं मत त्यांनी शनिवारी (१ ऑक्टोबर) व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.”

“आम्हाला आजही खात्री आहे की, मिलिंद नार्वेकर असं काही करणार नाहीत. तशी नक्कीच शक्यता नाही,” असंही किशोरी पेडणेकरांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं म्हटलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा, असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले.

गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “तुम्ही शंकरराव गडाखांकडून किती खोके घेतले हे आम्हाला माहिती आणि…”, संदीपान भुमरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

“गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar comment on speculations of milind narvekar joining shinde faction of shivsena pbs
First published on: 01-10-2022 at 20:37 IST