मुंबई : करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बुधवापर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी तोंडी हमी राज्य सरकारच्या वतीने सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे पेडणेकर यांना दोन दिवसांचा दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, पेडणेकर यांनी अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गेल्या आठवडय़ात सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पेडणेकर यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर पेडणेकर यांची याचिका सोमवारी सुनावणीसाठी आली. त्या वेळी, याचिकाकर्त्यां मुंबईच्या माजी महापौर असून करोनाकाळातील वैद्यकीय साहित्य खरेदी घोटाळय़ात त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी ही याचिका केली आहे, असे पेडणेकर यांच्या वतीने वकील राहुल आरोटे यांनी न्यायालयाला सांगितले. दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित असल्याचे सांगताना, बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तसेच, प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केल्यानंतर बुधवापर्यंत पेडणेकर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न केली जाणार नसल्याची तोंडी हमी सरकारी वकील पेठे यांनी न्यायालयाला दिली.

हेही वाचा >>>पोलिसांवर कारवाई, आंदोलकांना अभय; जालना लाठीमारप्रकरणी सरकारच्या वतीने माफी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात राहिल्यानेच सूड उगवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्याविरुद्ध तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण राजकीयदृष्टय़ा प्रेरित आहे, असा दावा पेडणेकर यांनी कारवाईपासून दिलासा मागताना केला होता. सोमय्या हे विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे सर्वश्रुत आहे, असा दावाही पेडणेकर यांनी अटकपूर्व जामीन मागताना केला आहे. रुग्णालयाला मृतदेह ठेवण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या पिशव्या उपलब्ध केल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या. एके काळी परिचारिका म्हणून काम केल्याने आपल्याकडे या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन ही बाब संबंधित साहित्य खरेदी करणाऱ्या विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे, महत्त्वाच्या व्यक्तीला साहित्य खरेदीचे कंत्राट मिळवून देण्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावाही पेडणेकर यांनी अंतरिम दिलासा मागताना केला आहे. करोनाकाळात महापालिकेची १३ जम्बो करोना केंद्रे, २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ३० रुग्णालयांच्या माध्यमातून कथित १२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचाही संशय असून, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishori pednekar is protected from action in the case of the medical supplies procurement scam during the corona period amy