मुंबई : गेल्या चार वर्षांहून अधिक काळ मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जल फाउंडेशन कोकण विभाग संघटना पाठपुरावा करत आहे. मात्र, या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन गांर्भीयाने घेत नाही. पत्रव्यवहार करून देखील त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिला.

रेल्वे प्रवाशांच्या मागण्या काय ?

  • ‘या’ रेल्वेगाड्यांना खेड रेल्वे स्थानकात थांबा द्या

गाडी क्रमांक १२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेस, १०११५/१०११६ मडगाव-वांद्रे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१४९/२२१५० पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२२०१/१२२०२ गरीबरथ एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२४४९/१२४५० गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २०९२४/२०९२३ गांधीधाम-तिरुनेलवेली एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२४७५/२२४७६ हिसार-कोईम्बतूर एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना खेड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.

  • दादर-रत्नागिरी रेल्वेगाडी पूर्ववत करण्यात यावी

करोना काळापासून दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद आहे. दादरवरून थेट रत्नागिरी जाण्यासाठी या रेल्वेगाडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. या रेल्वेगाडीमधून मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, विरार, नालासोपारा, पालघर, गुजरात येथील प्रवासी वर्ग अवलंबून होता. परंतु, ही रेल्वेगाडी बंद केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही रेल्वेगाडी दादरऐवजी दिव्यावरून सोडण्यात येते. त्यामुळे करोनापूर्वीप्रमाणे गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी ते दादरपर्यंत चालवण्यात यावी. तसेच चार डबे संगणकीकृत आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. गाडी क्रमांक १०१०३/१०१०३ मांडवी एक्स्प्रेसमधील तीन शयनयान डबे द्वितीय श्रेणी आरक्षित म्हणून करोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत करणे.

  • वातानुकूलित चेअर कार डबा वाढवावा

मुंबईवरून आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या गोवा, कर्नाटक आणि केरळसाठी सोडल्यामुळे खेडच्या प्रवाशांना विनाकारण शयनयान डब्यांमधून प्रवास करावा लागतो. ते टाळण्यासाठी मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्रमांक १२२२४ एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसप्रमाणे गाडी क्रमांक १०१०३/१०१०४ मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०११५/१०११६ मडगाव-वांद्रे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमधील एक किंवा दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी डब्यांचा व गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमधील पाच वातानुकूलित तृतीय श्रेणी डब्यांचा वापर वातानुकूलित चेअर कार म्हणून करावा.

  • मुंबई – चिपळूण दैनंदिन रेल्वेगाडी सुरू करावी

मुंबई – चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, वातानुकूलित चेअर कार व सामान्य अनारक्षित डबे असणारी व दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबणारी नवीन दैनिक गाडी सुरू करावी.

  • रिमोट आरक्षण कोटा वाढवावा

गाडी क्रमांक २२२३० मडगावहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२११६ करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमधील रत्नागिरी रिमोट आरक्षण कोटा एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतका वाढवावा. तर, गाडी क्रमांक १०१०४ मांडवी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १०११६ वांद्रे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२०५२ जनशताब्दी एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक २२१२० तेजस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा द्यावा, अशी मागणी जल फाउंडेशन कोकण विभाग संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष नितीन जाधव केली आहे.