मुंबई: हॉटेलमधील भंगारात काढण्यात आलेल्या काही सामानाचे मोठे कंत्राट देण्याचे अमिष दाखवून एका इसमाला ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. याबाबत विनोबा भावे नगर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या बाप-लेकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कुर्ला परिसरात अनेक वर्षांपासून भंगार विक्रीचा व्यवसाय करणारे इम्रान खान (४१) हे याच परिसरात कुटुंबियांसोबत राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या एका मित्राने त्यांची ओळख करिम खान नावाच्या इसमाशी करून दिली होती. करीम हा देखील मोठा भंगार विक्रेता असून तो मोठ-मोठे भंगार विक्रीचे कंत्राट संपूर्ण देशभरात घेतो. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे गोवा परिसरात त्याने इम्रान खान यांना एक मोठे कंत्राट दिले होते. यातून त्यांना मोठा फायदा झाल्याने त्यांचा त्याच्यावर अधिक विश्वास बसला होता. याच दरम्यान वर्षभरापूर्वी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमधील संपूर्ण एसी भंगारात विकण्यासाठी उपलब्ध असल्याचे आरोपीने इम्रान याला सांगितले होते.
इम्रान याने तत्काळ पुणे येथे जाऊन ६१ लाख रुपयात हा व्यवहार केला होता. त्यानुसार पाहिल्यांदा त्याने या मालाचे अर्धे पैसे आरोपीला दिले होते. मात्र अनेक दिवस उलटून देखील माल काढण्यात आला नव्हता. याच वेळी हॉटेल मालकाला आणखी काही पैसे हवे असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर इम्रान याने आरोपीला आणखी काही पैसे पाठवले. आशा प्रकारे त्याने आरोपीला एकूण ४७ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही आरोपी माल देण्यास टाळाटाळ करू लागला. अखेर इम्रान यांनी आरोपीच्या मुलाची भेट घेतल्यानंतर त्या हॉटेलमधील सर्व एसीचे कंत्राट दुसऱ्या इसमाला दिल्याची माहिती समोर आली. याबाबत त्यांनी आरोपीशी अनेकदा संपर्क साधला. मात्र त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. याबाबत तक्रारदार यांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात करीम आणि त्यांच्या मुलाबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.