मुंबई: राज्यातील महिलांच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून या संस्थाची नोंदणीही झाली आहे. राज्य सरकारची विविध कामे या महिला सहकारी संस्थांना देण्याबाबतचा निर्णय सरकार घेणार असून उद्योग, व्यापारातील त्यांचा सहभाग वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी शनिवारी येथे केली.

राज्याच्या विवि भागातून भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम दादर येथील योगी सभागृहात पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यभरातील बहीणींच्या पाठविलेल्या ३६ लाख ८७ हजार राख्या आपल्यार्यंत पोहोचल्या असून या राख्यांना भाषा, धर्म, पंथ, जात नाही, निरपेक्ष प्रेमाच्या ह्या राख्या प्रतिक आहेत. आपल्याला जन्मभर या बहीणींच्या ऋणातच रहायचे आहे, त्यांच्या प्रेमातून उतराई व्हायचे नाही असे सांगून फडणवीस म्हणाले, इतक्या बहीणींचे प्रेम ज्याच्यापाशी आहे अशा माझ्यासारख्या भावाला कुणाचीही भीती नाही. लाडक्या बहीणींच्या मताला ‘व्होट चोरी’ म्हणणारेच सर्वात मोठे चोर आहेत. व्होट चोरी म्हणणाऱ्यांचे डोके चोरी झाले आहे अशा शब्दात विरोधकांवर टीका फडणवीस यांनी टीका केली. परदेशात जाऊन भारताची बदनामी करणारे आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात ना बिहारमध्ये कोणी विचारत नाही. त्यामुळे विरोधकांची राज्यात गत झाली तीच बिहारधील निवडणुकीत होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘बेटी बचाव’ पासून ‘लखपती दीदी’ पर्यंत अनेक योजना राबविल्या जात आहेत. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून राज्यात मागील वर्षी २५ लाख भगिनी लखपती बनल्या असून राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्षीही तितक्याच महिलांना लखपती बनणार असून एक कोटी भगिनींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे ध्येय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकार लवकरच महिला सहकारी संस्थांना हक्काचे काम देणार आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार यात महिलांना पुढे आणले जाणार आहे असे सांगून राज्यात येत्या पाच वर्षांत महिलांसाठीची एकही योजना बंद होणार नाही. तसेच नागपूरमध्ये लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन पतसंस्था स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून महिलाना कर्ज पुरवठा करण्याची सुरू केलेली योजना राज्यभरात राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आशिष शेलार म्हणाले, राखीचा सण हा केवळ बहिणीच्या रक्षणापुरता राहिलेला नसून आता बहीण देखील आपल्या भावाची काळजी घेत आहे. झोपडपट्टीपासून मल्टिनॅशनल कंपन्यांपर्यंत कुठेही असणाऱ्या भाऊ आणि बहिणींमधील नाते सारखेच असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी देवाभाऊंनी अविरत केलेले काम सर्वापर्यंत त्यांच्या भगीनींनी पोहोचवायला हवे, असे आवाह रविंद्र चव्हाण यांनी केले.