मुंबई : राज्यातील तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा पारंपरिक शाखांबरोबरच नव्या तंत्रज्ञानाधारित व आधुनिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअरींग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांबरोबरच ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’ला विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. यंदा राज्यभरात १,२२,३२४ जागांवर तब्बल १,०७,९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ही टक्केवारी ८७.९१ इतकी आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या गेल्या तीन शैक्षणिक वर्षांच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये १ लाख ११ हजार २८६ जागांपैकी ८६ हजार ४६५ जागांवर प्रवेश झाल्याने ७७.७० टक्के प्रवेश झाले. २०२४-२५ मध्ये १ लाख १८ हजार ५२४ पैकी ९५ हजार ५११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने प्रवेशाची टक्केवारी ८०.३९ झाली आहे.

यंदा राज्यातील ४०० संस्थात १ लाख २२ हजार ३२४ जागांसाठी सर्वाधिक १ लाख ४० हजार ३४ अर्ज आले होते. त्यापैकी तब्बल १ लाख ०७ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे यंदा प्रवेशाचे प्रमाण हे ८७.९१ टक्क्यांवर पोहचले. यंदा झालेल्या प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पारंपरिक लोकप्रिय शाखांना नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यंदा माहिती तंत्रज्ञान आणि इतर आधुनिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढल्याचे दिसते आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक २० हजार ९०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल मेकॅनिकल इंजिनिअरिंगला २० हजार ५९३, इलेक्ट्रिकलला १५ हजार ७६८ आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला १६ हजार ४४१ प्रवेश घेतले आहेत. तसेच मुंबई विभागातून कम्प्युटर इंजिनिअरिंगला २ हजार ९९९, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला २ हजार ५४९ यानंतर माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमाला १ हजार २२४ विद्यार्थांनी प्रवेश घेतले. मात्र पुण्यामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला कमी प्रवेश झाले. ६ हजार ८७० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या शाखांमध्ये ११ हजारांहून अधिक प्रवेश झाले.

अमरावती विभागात मेकॅनिकल व सिव्हिल अभियांत्रिकी या पारंपरिक शाखांना प्रतिसाद कायम राहिला. छत्रपती संभाजीनगर विभागात कॉम्प्युटर, मॅकनिकल इंजिनिअरींग सर्वाधिक विद्यार्थीप्रिय शाखा ठरल्या असून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनलाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. नागपूर विभागात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या जुन्या पसंतीच्या शाखा प्रभावी ठरल्या आहेत.

नाशिक विभागात कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल शाखेकडे सर्वाधिक ओढा आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा कल लक्षात घेतला तर पारंपरिक शाखांची पकड काही प्रमाणात कमी झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरी भागांत आयटी आणि आधुनिक अभ्यासक्रमांची मागणी झपाट्याने वाढली आहे.

पॉलिटेक्निक प्रवेशाचा तीन वर्षाचा आलेख

शैक्षणिक वर्ष……….. एकूण जागा ………..झालेले प्रवेश

२०२५-२६ ………..१,२२,३२४……….. १,०७,९१०

२०२४-२५ ………..१,१८,५२४ ………..९५,५११

२०२३-२४ ………..१,११,२८६ ………..८६,४६५

२०२५-२६ मध्ये असे झाले प्रवेश

अभ्यासक्रम……. जागा…….प्रवेश

कॉम्प्युटर इंजिनिअरींग …… २२,४०६…२०,९०५

मेकॅनिकल इंजिनिअरींग…… .२५,७४६…२०,५९३

सिव्हिल इंजिनिअरींग……… २०२०६…१५,८५३

इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग…… १८,१३१…१५,७६८

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग…. .९९४५.. ८,१३३