मुंबई : अतिवृष्टी आणि महापुराने राज्यासमोर नुकसानीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पण, दुसरीकडे तुडूंब भरलेल्या धरणांमुळे पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामासह पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. मोठ्या धरणांतील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. अपवाद वगळता राज्यातील सर्व मोठी आणि मध्यम धरणे भरून वाहत आहेत. धरण सुरक्षा, पूर नियंत्रणासाठी विसर्ग सुरू आहे.
राज्यात १३८ मोठे, २६० मध्यम आणि २५९९, असे एकूण २९९७ धरण प्रकल्प आहेत. या धरण प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ९०.३५ टक्क्यांवर गेला आहे. अपवाद वगळता सर्व धरणे तुडूंब भरली आहेत. धरण सुरक्षा आणि पूर नियंत्रणाच्या कारणांमुळे धरणात शंभर टक्के पाणीसाठी करता येत नाही. पाऊस संपल्यावर पाझराच्या पाण्याची आवाक होऊन उर्वरीत धरण शंभर टक्के भरते. त्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यातील धरणांत ९०.३५ टक्के पाणीसाठी झाला आहे.
विभागनिहाय विचार करता, कोकण विभागात ९३.८७ टक्के, पुणे विभागात ९३.४८ टक्के, नाशिक ८६.१४ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८६.५१ टक्के, अमरावती विभागात ८९.३० टक्के आणि नागपूर विभागात ८९.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९६.९१ टक्के, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा ८२.४५ टक्के आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा ६५.३९ टक्के झाला आहे.
ताम्हिणी घाटात सर्वाधिक ९४८० मिमीची नोंद
पश्चिम घाट आणि सातपुडा पर्वत रागांच्या परिसरात राज्यातील बहुतेक मोठी धरणे आहेत. ही सर्व धरणे भरून वाहत आहेत. पश्चिम घाटाचा विचार करता यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरअखेर ताम्हिणीत सर्वाधिक ९४८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अंबोलीत ७०५८ मिमी, पाथरपुंज येथे ७५८९ मिमी, महाबळेश्वरमध्ये ६१९७ मिमी, लोणावळ्यात ५६१० मिमी, माथेरानमध्ये ५९४७ मिमी, रतनवाडीत ५६३६ मिमी, इगतपुरीत ४४८५ मिमी आणि त्रंबकेश्वरमध्ये २९१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्व मोठे धरण प्रकल्प तुडूंब भरले आहेत. मोठ्या धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. पश्चिम घाटासह राज्याच्या अन्य भागात दमदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा समाधानकारक झाला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.