मुंबई : मोसमी पावसाच्या हंगामात १ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरात सरासरीच्या १०८ टक्के, तर राज्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९९४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ११८९.४ मिमी पावसाची नोंद झाली. सातारा येथे सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पावसाची नोंद झाली. देशात ९३७.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र ८६८.६ मिमी पाऊस नोंदला गेला. देशात बिहार, आसाम-मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या तीन उपविभागांमध्ये कमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, हे क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रामुळे विदर्भात गुरुवारपासून शनिवारपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यंदा नैत्रत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला. केरळमध्ये १ जून रोजी दाखल होणारा पाऊस यंदा लवकर २४ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर लगोचच २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. मुंबईसह पुणे इतर काही भागात २६ मेपासून धडक दिली आणि १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. दरम्यान, १ जून ते ३० सप्टेंबर २०२५ च्या मोसमी पावसाच्या हंगामात देशात सरासरीच्या १०८ टक्के, तर राज्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे. तेथे सरासरीच्या ६१ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. तर सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पावसाची नोंद झाली. कोकण विभागात पालघर वगळता इतर भागात सरासरीइतकी पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये सरासरीच्या ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच पावसाने सरासरी ओलांडली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात पावसाची फारशी शक्यता नाही. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसतील.

देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पाऊस

देशात ऑक्टोबर महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महारष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑक्टोबर – डिसेंबरदरम्यान तमिलनाडू, कराईकल, आंध्र प्रदेशची आणि यनमच्या किनारपट्टीसह केरळमध्ये आणि कर्नाटकामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ११२ टक्के अधिक पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तापमान कमी

देशात ऑक्टोबर महिन्यात किमान आणि कमाल तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य भारत, पूर्व भारत, पश्चिम हिमालयीन राज्य आणि सौराष्ट्र, कच्छमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या काही भागांत किमान तापमान सरसरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात किमान तापमान अधिक राहील.

राज्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पडलेला जिल्हानिहाय पाऊस (मिमीमध्ये)

मध्य महाराष्ट्र

नाशिक- १२४७.९ मिमी

सोलापूर- ११२२.८ मिमी

महाबळेश्वर- ६६८९.७ मिमी

मराठवाडा

नांदेड- १३४०.४ मिमी

धाराशिव- १२००.२ मिमी

कोकण

रत्नागिरी- ३८१९ मिमी

डहाणू- २६९०.४ मिमी

अलिबाग- २३७४ मिमी

कुलाबा- २७६६.२ मिमी

सांताक्रूझ- ३४९०.४ मिमी

विदर्भ

ब्रह्मपुरी- १८१०.६ मिमी

नागपूर- १२१६.९ मिमी

वर्धा- ११९४.४ मिमी