मुंबई : अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, डेन्मार्कमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी वर्ग सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून, त्यासाठी आवश्यक अर्ज नोंदणी प्रक्रिया २६ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका व महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभाग यांच्यामध्ये अनिवासी भारतीय मराठी पालकांच्या मुलांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये सामंजस्य करार झाला. या करानुसार बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कॅनडा, डेन्मार्क व अमेरिकेतील एकूण ६० शाळांच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
गतवर्षी या अभ्यासक्रमासाठी १०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन’ पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांचे वर्गामध्ये मूल्यांकन करून परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा बालभारतीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषा पुस्तकांच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येते.
प्रथम वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा मुक्त विद्यालय मंडळाने दुसऱ्या वर्षीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, डेन्मार्क या देशातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २६ सप्टेंबरपासून https://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना ५ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ६ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संपर्क केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संपर्क केंद्रानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी २५ ऑक्टोबर रोजी राज्य मंडळ कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्र. सचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यंदा प्रथमच होणार ऑस्ट्रेलियाचा समावेश
बृहन्महाराष्ट्र मंडळ व राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे मराठी भाषेसंदर्भात घेण्यात येणारी ही परीक्षा गतवर्षी अमेरिका, कॅनडा व डेन्मार्क या देशांमध्ये प्रथमच झाली होती. मात्र यंदा त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला असून, ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलँड व सिडनी या दोन ठिकाणी केंद्र असणार आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, नार्वे आणि जपानमध्ये ही परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंडळाचे समन्वयक राजेंद्र आंधळे यांनी दिली.