मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या रवींद्र वायकर यांना फक्त २२१ मतांची आघाडी देणाऱ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार अमित साटम यांना यंदा कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्या ज्या अशोक जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तेच या वेळी पुन्हा समोर आहेत. मात्र, या वेळची स्थिती वेगळी असून शिवसेनेतील फुटीनंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष एकत्र असल्याचा फायदा जाधव यांना मिळण्याची शक्यता आहे. ही आघाडी साटम यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल. २००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. पूर्वीच्या आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन हा नवा मतदारसंघ निर्माण झाला आणि काँग्रेसचे अशोक जाधव ५९ हजार ८९९ मते मिळवून आमदार बनले.

मतांचे ध्रुवीकरण

इंदिरा नगर, कपासवाडी, गावदेवी आदी झोपडपट्टीचा परिसर मोठ्या संख्येने हमखास मतदानाला उतरतो. त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत झाला होता. गेल्या दहा वर्षांत सक्रिय आमदार म्हणून साटम यांची मतदारसंघात प्रतिमा असून विधिमंडळाच्या उत्कृष्ट संसदपटूचेही ते मानकरी ठरले आहेत. उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीयांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था, अत्याधुनिक परिसर व्यवस्थापन (एएलएम) या संस्थांच्या माध्यमातून साटम यांनी जोरदार संपर्क जाळे निर्माण केले आहे. या मतांच्या जोरावरच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठी आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्याने साटम थोडे धास्तावले आहेत. त्यात माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी बंडखोरी मागे घेतली आहे.

हेही वाचा >>> वरळी बीडीडीतील ३५ हून अधिक चाळींतील रहिवासी मतदान करणार, मतदानावरील बहिष्काराचा निर्णय अखेर मागे

एकूण मतदार – २,८८,१२५

पुरुष- १,४८,८४६

महिला- १,३९,२७२

उच्चभ्रूंची उदासीनता?

लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यानंतरच अशोक जाधव अधिक सक्रिय झाले. त्याआधी त्यांचा फारसा संपर्क या मतदारसंघाशी नव्हता. त्यामुळे जाधव यांना मतदारांची कितपत साथ मिळते यावर या साटम यांचे भवितव्य अवलंबून आहे. या मतदारसंघात ८१ हजार १०० (२८ टक्के) मुस्लीम तर ६७ हजार ८०० (२४ टक्के) मराठी मते आहेत. याशिवाय गुजराती-मारवाडी ४१ हजार ७०० तर उत्तर भारतीय ४१ हजार १०० मते आहेत. याशिवाय २७ हजार दक्षिण भारतीयांची मते आहेत. यापैकी बरेचसे मतदार हे उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय वस्तीत राहतात. मतदार करण्यात फारसे उत्साही नसतात.

बदलती समीकरणे

भाजप-सेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परंतु सेनेच्या विष्णू कोरगावकर यांना फक्त २७ हजार ७४१ मते मिळाली. २०१४ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसच्या जाधव यांचा पराभव झाला. त्या वेळी भाजप व सेना स्वतंत्रपणे लढत असल्याचा फायदा भाजपला झाला आणि साटम पहिल्यांदा आमदार बनले. त्या वेळी जाधव यांना ३४ हजार ९८२ आणि सेनेच्या जयवंत परब यांना २६ हजार ७२१ मते मिळाली. २०१९ मध्ये युती असल्यामुळे साटम यांच्या मतांमध्ये वाढ होऊन त्यांना ६५ हजार ६१५ मते मिळाली तर जाधव यांना ४६ हजार ६५३ मते मिळाली. यावरून एक मात्र निश्चित आहे की, काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांची एकत्रित मते साटम यांना विजयापासून दूर नेऊ शकतात. खरे तर कामाच्या जोरावर साटम निवडून यायला हवेत. पण दुर्देवाने मतांच्या ध्रुवीकरणावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे दिसते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 bjp mla amit satam face a tough challenge in andheri west constituency mumbai print news zws