मुंबई : साप सावल्याचा आरडाओरडा करत वांद्रे-वरळी सीलिंकवर व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि समुद्रात उडी मारल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. व्यावसायिक अमित शांतीलाल चोप्रा (४७) यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. व्यावसायिक कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांना त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही, त्यामुळे कुटुंबियांकडून माहिती घेतल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
चोप्रा मूळचे राजस्थान येथील रहिवासी असून त्यांचे सर्व नातेवाईक तेथेच वास्तव्यावला आहेत. चोप्रा पत्नी व मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे वास्तव्याला होते. तसेच मुंबईतच इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करीत होते. मंगळवारी मध्यरात्री १ वाजता चोप्रा यांनी टॅक्सी पकडली. वांद्रे मार्गे टॅक्सी सीलिंकवर आल्यानंतर आपल्याला साप चावला असा आरडाओरडा चोप्रा यांनी केला. त्यामुळे घाबरून टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला थांबवली. त्यानंतर चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला व त्यांनी सीलिंकवरून समुद्रात उडी मारली.
याप्रकारामुळे टॅक्सी चालक घाबरला व त्याने तात्काळ हा प्रकार सीलिंक कर्मचारी व पोलिसांना सांगितला. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी चोप्रा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून शोधमोहीम सुरू केली. पण अंधार असल्यामुळे चोप्रा सापडले नाहीत.
मच्छीमारांना समुद्रात दिसला मृतदेह
समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या दोन मच्छीमारांना बुधवारी सकाळी मृतदेह तरंगताना दिसला. सांताक्रुझ किनाऱ्यावर होडी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांताक्रुझ पोलिसांचे पथक मच्छीमार व अग्निशमन दलाच्या मदतीने समुद्रात पोहोचले. मच्छीमारांनी मृतदेह पाहिलेल्या ठिकाणी पोलिसांना नेले. तेथून मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून त्या व्यक्तीचा फार पूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
मृतदेहाची ओळख पटली
सांताक्रुझ पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिली. त्यावेळी वांद्रे-वरळी सीलिंकवरून उडी मारलेला व्यक्ती तोच असल्याचा वांद्रे पोलिसांना संशय आला. त्यामुळे तेथे जाऊन तपासणी केली असता तो मृतदेह चोप्रा यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. चोप्रा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. तसेच चोप्रा यांनी मृत्युपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यू कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान राजस्थान येथूनही त्याचे इतर कुटुंबिय मुंबईत येण्यासाठी निघाले असून त्यांच्याकडूनही पोलीस अधिक माहिती घेणार आहेत.