मुंबई / ठाणे : मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला तर लोकल गाडय़ांचे वेळापत्रक सलग तिसऱ्या दिवशी विस्कळित झाले. संध्याकाळनंतर पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा मिळाला.
मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह संततधार पाऊस सुरू होता. सकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. मुलुंड, बोरिवली, अंधेरी, सांताक्रूझ, कुलाबा येथे जोर अधिक होता. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावल्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी नोकरदारांना कसरत करावी लागली. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात ३१.७२ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ८४.४० मिलीमीटर, पश्चिम उपनगरात ८३.०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
ठाणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. जिल्ह्यातील मुख्य मार्ग, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्डे, पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. ठाणे, भिवंडी, कल्याण, बदलापूर या शहरांत पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वृंदावन सोसायटी, वंदना सिनेमा, कॅडबरी भागात गुडघाभर पाणी साचले होते. घोडबंदर मार्गावर दिवसभर कोंडी होती. राम मारूती रोड, कोपरीसह अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले.
पुढील दोन दिवस अतिवृष्टी
आणखी चार ते पाच दिवस मोसमी पाऊस सक्रिय राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २९ आणि ३० जूनला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
झाडे कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबईतील मालाड आणि गोरेगाव परिसरात झाडे उन्मळून पडण्याच्या वेगवेगळय़ा घटनांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला. मालाड पश्चिम परिसरातील मामलेदार वाडी येथील पिंपळाचे सकाळी ७.३० च्या सुमारास उन्मळून पडले. झाड अंगावर पडल्यामुळे कौशल दोषी (३८) यांचा मृत्यू झाला. गोरेगावच्या एम. जी. रोडवरील मिठा नगरातील जुन्या महापालिका वसाहतीत प्रेमलाल निर्मल (३०) यांच्या घरावर दुपारी ३.३० च्या सुमारास झाडाची मोठी फांदी कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत एकूण २२ ठिकाणी २६ झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.