बदलापूर स्थानकात सहा मिटर रुंदीच्या पादचारी पूलासाठी मध्य रेल्वेकडून गर्डरचे काम करण्यात येणार असून त्यासाठी रविवार, ३ जुलैला विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाने दिली. हा ब्लॉक सकाळी १०.५० ते दुपारी ०१.१० पर्यंत अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर असेल. त्यामुळे कल्याण ते अंबरनाथ, बदलापूर दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.
कल्याण येथून सकाळी १०.१३ ते दुपारी १.२६ पर्यंत अंबरनाथ, बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल आणि बदलापूर येथून सकाळी १०.२६ ते दुपारी १.२२ पर्यंत सुटणाऱ्या अप उपनगरी लोकल रद्द राहतील.ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत दरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
याशिवाय गाडी क्रमांक 17032 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही कर्जत – पनवेल – दिवा मार्गे वळवण्यात येईल. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्यांना दिवा येथे दुहेरी थांबा दिला जाणार आहे. ही गाडी निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिरा पोहोचतील.
सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर ब्लॉक –
अभियांत्रिकी कामे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाउन मार्गावर चालवल्या जातील.
घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावर पाच तासांचा मेगाब्लॉक –
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. या ब्लॉकमुळे ठाणे- वाशी, नेरुळ आणि बेलापूर, नेरुळ – खारकोपर या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम होणार नाही.
ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.ठाणे ते वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सेवा उपलब्ध असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार आहेत.