मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा, टिकूजीनीवाडी येथील गृहप्रकल्पासाठी जून २००० अर्ज मागविले होते. त्यानुसार मंडळाकडे अर्ज सादर झाले. मात्र काही कारणाने ही योजना झालीच नाही आणि अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण आता मात्र तब्बल २५ वर्षांनी कोकण मंडळाला या अर्जदारांची आठवण झाली आहे. त्यामुळेच आता जून २००० मध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांना चितळसर, मानपाडा, टिकुजीनीवाडी प्रकल्पातच बहुमजली इमारतीत घर देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे.
त्यानुसार १५ जुलै रोजी म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात सकाळी ११ वाजता उपस्थित राहून त्यावेळी अर्ज केलेल्यांना समंतीपत्र सादर करता येणार आहे. यावेळी आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.
कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा, टिकुजीनीवाडी येथे एक गृहप्रकल्प बांधण्याचा निर्णय घेतला. येथील घरांच्या सोडतीसाठी जून २००० मध्ये संकेत क्रमांक १३८ आणि १३९ योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले. याला प्रतिसाद देत १५६ जणांनी अर्ज सादर केले. मात्र या संकेत क्रमांकासाठी सोडत निघालीच नाही आणि अर्जदारांचे घरांचे स्वप्न भंगले. ज्या जागेवर घरे बांधली जाणार होती, त्या जागेवर ठाणे महानगरपालिकेने विस्थापित गृहनिर्माण योजना असे आरक्षण प्रस्तावित केले.
परिणामी, ठाणे पालिकेने कोकण मंडळाच्या प्रकल्पास मान्यता दिली नाही आणि प्रकल्प रखडला. मात्र पुढे २००६ मध्ये याच जागेवर स्वीस चॅलेंज पद्धतीने विकासकाकडून बहुमजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव आणला. २००६ मध्ये हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. बहुमजली इमारत तयार झाली असून या प्रकल्पांतील घरांची विक्री सोडतीद्वारे केली जाणार आहे.
मात्र त्याचवेळी या प्रकल्पातील काही घरे जून २००० मध्ये सोडतीसाठी अर्ज केलेल्यांसाठी राखीव ठेवण्यात आली असून त्या अर्जदारांना ही घरे वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी अर्ज केलेल्यांचे म्हाडाच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मंडळाच्या जाहीर सूचनेनुसार जून २००० मध्ये अर्ज केलेल्यांकडून १५ जुलै रोजी म्हाडा भवनात सकाळी ११ वाजल्यापासून संमतीपत्र आणि कागदपत्रे सादर करून घेतली जाणार आहेत. त्यावेळी अर्ज केलेल्यांपैकी ज्यांना अद्याप म्हाडा वा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून घर मिळालेले नाही अशाच अर्जदारांना संकेत क्रमांक १३८ आणि १३९ योजनेत घरे दिली जाणार आहेत.
त्यासाठी दाखल संमतीपत्र आणि कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांसाठी सोडत काढून घरांचे वितरण केले जाणार आहे. मात्र सर्व पात्र अर्जदारांना घर मिळणार असून सोडत केवळ कोणत्या मजल्यावर कोणते घर याची निश्चिती करण्यासाठी असणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या घरांसाठी नवीन विक्री किमती लागू होणार आहे.