ऑनलाईन अनामत रकमेसह १० जुलैपर्यंत तर आरटीजीएस-एनईएफटीद्वारे १२ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला, म्हणजेच अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज विक्री – स्वीकृतीस कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असून शुक्रवारी मंडळाने सोडतपूर्व प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. आता १० जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर आरटीजीएस-एनईएफटीद्वारे १२ जुलैपर्यंत अनामत रक्कम भरूनत अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच १८ जुलै रोजी काढण्यात येणारी सोडतही रद्द करण्यात आली असून सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह पहिल्यांदाच मुंबई मंडळाची सोडत काढण्यात येत आहे. इच्छुकांना आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. तर दुसरीकडे सोडतीला प्रतिसादही कमी मिळाल्याने मुदतवाढ देणे गरजेचे होते. या बाबी लक्षात घेऊन मंडळाने अखेर १० ते १२ जुलैपर्यंत अर्ज विक्री – स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैयस्वाल यांच्याकडे सादर केला होता. उपाध्यक्षांनी शुक्रवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या मंजुरीनंतर मंडळाने आता सोडतपूर्व प्रक्रियेचे नवे वेळेपत्रक जाहीर केले आहे. मुदतवाढ दिल्याने आता इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर सोडतीतील अर्जांची संख्या एक लाखावर जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नवी तारीख जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर सोडतीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada mumbai mandal lottery 2023 new schedule of pre release process announced mumbai print news amy