मुंबई : मुंबईसह राज्यामध्ये पावसामुळे हाहाकाल उडाला असून मुंबईला दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर काही प्रमाणावर परिणाम झाला आहे. मुंबईत जीवनावश्यक वस्तू पोहोचण्यास विलंब होत असून पावसाची स्थिती अशीच राहिल्यास मुंबईत दूध – भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तरीदेखील राज्याच्या विविध भागातून दूध आणि भाजीपाल्याची आवक सुरू आहे. पावसामुळे राज्यातील ठिकठिकाणांहून मुंबईत जीवनावश्यक वस्तू पोहचायला विलंब आहे. असे असले तरी आवक मात्र नेहमीप्रमाणेच आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागातून आणलेल्या दुधाचे पॅकिंग वाशीमध्ये होते. मात्र, मुंबईतील पावसाचे प्रमाण बघता तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईत दूध आणि भाजीपाला पोहचविण्यास अडचणी येत आहे.
ठिकठिकाणी कोसळणारा संततधार पाऊस, साचलेले पाणी आणि वाहतूक कोंडीमुळे वाहने मुंबईत वेळेवर पोहोत नसल्याचे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. नवी मुंबईत दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर स्थानिक दूध विक्रेत्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. प्रामुख्याने अंधेरी, ठाणे, जोगेश्वरी या भागात दूध पोहचविण्यास कसरत करावी लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे मंगळवारी या भागांमध्ये दुध पुरवठा करता आला नाही, असे हिरे नॅचरल्स ऑरगॅनिक मिल्कचे संचालक भारत हिरे यांनी सांगितले. याचबरोबर नवी मुंबईत पावसाचे प्रमाण अधिक असले तरी पाणी साचण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या भागात शक्यतो कोणतीही अडचण येत नसल्याचेही हिरे यांनी सांगितले.
दूध, भाजीपाला पुरवठा कसा होतो
मुंबईसाठी दुधाचा मोठा पुरवठा वाशी डेअरी (महावितरण व एमएमआरडीएच्या नियंत्रणाखालील डेअरी कॉम्प्लेक्स) येथून होतो. बहुतांश पॅकिंग वाशी डेअरीत केले जाते आणि नंतर ट्रकमधून मुंबईतील विविध भागात पुरवठा होतो. याचबरोबर मुंबईसाठी भाजीपाल्याचा पुरवठा वाशी येथील कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) येथून होतो. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, तसेच गुजरात व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि फळे वाशी एपीएमसीला येतात. तेथून ट्रक, टेम्पो व छोट्या गाड्यांमधून मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये भाजीपाला पोहोचवला जातो. त्यामुळे वाशीपर्यंतची आवक होत आहे. पण वाशीहून मुंबई शहरात माल नेण्यात अडचणी येत आहेत. मुंबईमधील ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचल्याने भाजीपाला, दुधाच्या गाड्या उशिरा विलंबाने पोहोचत आहेत.