मुंबई : वरळी – शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत १२५ जूना पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. या द्विस्तरीय पुलाच्या बांधकामासाठी प्रभादेवी पूल बंद करून त्याचे पाडकाम करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए आणि मुंबई वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.
मात्र या प्रकल्पात बाधित होणाऱ्या दोन इमारतींतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा निकाली न लावता पूल बंद केला जात असल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच बुधवारी रात्री प्रभादेवी पूल बंद करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला. मात्र त्यांचा हा प्रयत्न रहिवाशांनी रस्त्यावर उतरून पूल बंदचे फलक हटविून हाणून पाडला. यापुढे पूल बंद करण्याचा प्रयत्न केला तर रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील आणि तुमचा हा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, अशा इशारा रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेनंतर तूर्तास पूल बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्विस्तरीय पुलाच्या कामासाठी जुना पूल पाडण्याकरीता एमएमआरडीएने फेब्रुवारीमध्ये वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी १०, १२ वीच्या परीक्षा लक्षात घेऊन पूल बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर एप्रिलमध्ये पूल बंद करण्याचा प्रयत्न झाला असता प्रकल्पात बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत हा पूल बंद होऊ दिला नाही. दोन इमारतीतील रहिवाशांच्या योग्य पुनर्वसनासह या दोन इमारतींसह लगतच्या १७ इमारतींच्या समूह पुनर्विकासासंबंधीही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी पूल बंद करण्यास, त्याचे पाडकाम करण्यास जोरदार विरोध केला आहे.
रहिवाशांचा विरोध असतानाही एमएमआरडीएने आता पुन्हा गणेशोत्सवानंतर हा पूल बंद करून पाडकाम करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार १० सप्टेंबरच्या रात्रीपासून पूल बंद केला जाणार होता. पण रहिवासी पूल बंद होऊ न देण्यावर ठाम होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी, एमएमआरडीएने सावध भूमिका घेत १० सप्टेंबरला पूल बंद होईल की नाही याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
पण बुधवारी रात्री मात्र वाहतूक पोलिसांनी परिसरात प्रभादेवी पूल बंद करण्यासंबंधीचे दोन फलक लावले. याची माहिती मिळताच रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हे फलक हटवले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता बुधवारी रात्री पूल बंद न करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला. तर दुसरीकडे गुरुवारी पोलिसांनी रहिवाशांना बैठकीसाठी बोलावले.
भोईवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी रहिवासी, पोलिसांची बैठक पार पडली. यावेळी रहिवाशांनी योग्य पुनर्वसनासंबंधीचा ठोस निर्णय झाल्याशिवाय पूल बंद होऊ देणार नाही. पूल बंद करण्याचा प्रयत्न केला तर रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा रहिवाशांनी दिल्याची माहिती बाधित इमारतीतील रहिवाशी मुनाफ ठाकूर यांनी दिली. रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेनंतर तूर्तास पूल बंद केला जाणार नाही. तर दोन दिवसांनंतर याप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. आता दोन दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत प्रभादेवी पुलाच्या वादावर तोडगा निघतो का आणि द्विस्तरीय पुलाच्या बांधणीचा मार्ग मोकळा होतो का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.