मुंबई : मानखुर्द मेट्रो स्थानकातील तब्बल ४४ लाख रुपये किमतीच्या तांब्याचे पाईप आणि तारांची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व उपनगरातील मानखुर्द परिसरात मंडाळा – ठाणे कासारवडवली मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून चेंबूरच्या डायमंड उद्यान – मंडळा मेट्रो मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
या मार्गावर २०२५ च्या अखेर मेट्रो सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनी कामाची पाहणी करीत आहे. पाहणीदरम्यान वातानुकूलित यंत्रणा आणि इतर कामासाठी वापरण्यात आलेले तांब्याचे पाईप आणि तारा गायब झाल्याचे एका अधिकाऱ्याच्या लक्षात आले.
अधिकाऱ्याने यासंदर्भात सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली. मात्र कोणालाही याबाबत माहिती नसल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरात येथे तांब्याचे पाईप आणि तारांची चोरी झाली असून त्यांची किंमत तब्बल ४४ लाख रुपये आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.