मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षी दसऱ्यानिमित्त बेस्ट उपक्रमात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन बेस्ट उपक्रमाच्या महाव्यस्थापक डॉ. सोनिया सेठी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेत ५०० रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे चित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच त्यात मिशन सिंदूरचा जयघोष करण्यात आला आहे. या नोटेवर नरेंद्र मोदी यांच्या मागे महात्मा गांधींचे चित्र आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्ट उपक्रमात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात साकारलेली ५०० रुपयांची रांगोळी लक्षवेधी ठरली आहे. या रांगोळीतील ५०० रुपयांच्या नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पाठीमागे महात्मा गांधी यांची प्रतिमा दिसत आहे. ‘हे राम ! नव्हे जय श्रीराम’ असा संदेश या रांगोळीत देण्यात आला आहे. या ५०० च्या नोटेवर ‘महान भारतीय सेना’ असा मजकूर लिहिला आहे. पंतप्रधान मोदी सलामी देत असल्याचे चित्र आहे. यासह मिशन सिंदूरची तारीख आणि धनुष्यधारी व्यक्तीच्या चित्राचा त्यात समावेश आहे. तसेच दहशतवादीशी सामना करण्याबाबतीच्या प्रतिज्ञेचा पंतप्रधान मोदींचा स्वाक्षरीनिशी संदेश त्या नोटेवर आहे.

नागरिकांसाठी रांगोळी प्रदर्शन खुले

बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील इलेक्ट्रिक हाऊसमध्ये २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० दरम्यान हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे. नागरिकांनी या रांगोळी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी २७ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेली ५०० रुपयांची नोट एक्सवर (ट्विटर) प्रसारित केली होती. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही छायाचित्र असलेल्या नोटा पोस्ट केल्या होत्या. यासह “अखंड भारत..नवीन भारत.. महान भारत.. जय श्री राम.. जय मातादी!, असे ट्विट राम कदम यांनी केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी घोषित केली. ५०० रुपये आणि एक हजार मूल्याच्या जुन्या चलनी नोटा बंद करून, त्याबदल्यात नवीन ५०० रुपयांच्या नोटा आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्यानंतर याविषयी अनेक अफवा पसरविण्यात आल्या होत्या. दोन हजार रुपयाच्या नोटेत चीप असल्याने त्या कुठेही लपवून ठेवल्यास सापडतील. तसेच दोन हजार रुपयांची नोट स्कॅन केल्यावर काही विशिष्ट ॲप्समुळे नोटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकायला मिळते, अशा अफवा पसरल्या होत्या.